राहुरी :- अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाला नुकसानभरपाई देण्यासाठी भाग पाडू, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
रविवारी त्यांनी राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी व विविध ठिकाणी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आमदार प्राजक्त तनपुरे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार एफ. ए. शेख, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव, डॉ. राजेंद्र बानकर, माणिकराव तारडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश देठे, नंदकुमार गागरे पाहणी दौऱ्यात होते.
वडेट्टीवार म्हणाले, सरसकट पिकांचे पंचनामे करणे गरजेचे आहे. कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी. सोयाबीनचे शंभर टक्के, कपाशीचे ९० टक्के, मका जनावरांचा चारा, कांदा या पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन व कपाशीला हेक्टरी २५ हजार भरपाई मिळणे गरजेची आहे. शेतकऱ्यांनी काढलेले फोटो ग्राह्य धरावेत.
गेल्या पाच वर्षात पुरेशी कर्जमाफी झालेली नाही. पीक विमा मिळाला नाही. अशी स्थिती असताना नैसर्गिक आपत्तीने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे ३५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दहा हजार कोटीची भरपाई जाहीर केली. ती तुटपुंजी आहे. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या भागात अतोनात नुकसान झालेले आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांना पूरग्रस्तांची पाहणी करण्यास वेळ नाही व मदत देण्यासाठी हात आखडता घेतला, असा आरोप त्यांनी केला.