कर्जत – जामखेड विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू मंत्री म्हणून ओळख असलेले राम शिंदे आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यामध्ये ही लढत होत आहे. मतदारसंघांमध्ये १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लढत दुहेरीच होणार यात मात्र शंका नाही!
कर्जत – जामखेड – विधानसभा मतदारसंघावर मागील २५ वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. यापूर्वी तीन वेळा या मतदारसंघांमधून सदाशिव लोखंडे आणि त्यानंतर दोन वेळा राम शिंदे यांनी विजय मिळविला आहे. राम शिंदे यांच्या हॅट्रिकचे स्वप्न पूर्ण होते का बारामतीकरांना कर्जत – जामखेडकर संधी देतात, – याकडेच आता लक्ष लागले आहे. हा मतदारसंघ दोन तालुक्यात विभागला गेला आहे.
जातिपातीच्या समीकरणामुळे हा मतदारसंघ सोपा नाही. भाजपचे सर्व स्थानिक संस्थांमध्ये वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला कोणतीही पूरक परिस्थिती नसतानाही रोहित पवार यांनी या मतदारसंघाची निवड केली आहे. त्यांची राज्याच्या राजकारणाची सुरुवात होईल की नाही, याचे भवितव्य ठरविणारा हा मतदारसंघ ठरेल. विशेष म्हणजे भाजपचा बालेकिल्ला असूनही त्यांनी मंत्री राम शिंदे यांच्यापुढे चांगले आव्हान निर्माण केले आहे.
हायटेक यंत्रणा वापरून त्यांनी मतदारसंघातील वाडी वस्ती पिंजन काढली. त्यांच्या प्रचारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, खा. सुप्रिया सुळे या पवार परिवारातील सदस्यांनी हजेरी लावत वातावरण निर्मिती केली. या शिवाय विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. अमोल कोल्हे, यांच्याही सभा झाल्या.
राम शिंदे यांनी देखील पाच वर्षांमध्ये केलेल्या विकास कामाचा आढावा जनतेसमोर मांडताना एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असल्याचे भावनिक आवाहन केले. राज्यात भाजपचे सरकार येणार आणि मी पुन्हा मंत्री होणार, असा विश्वास ते देत आहेत.
त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सभा झाल्या. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शेवटच्या दिवशी होणारी सभा रद्द झाल्याने कार्यकर्ते हिरमुसले असले, तरी शेवटच्या दोन रात्री भाजप कार्यकर्ते आणि इतर पक्षातील नेते काय करतात, याकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.