मागील २०१४च्या निवडणुकीत चौरंगी लढतीत मतविभागणीचा फायदा मिळून जगतापांना विजय मिळाला होता. पण तो विजय ‘अपघाती’ नव्हता, हे सिद्ध करण्याचे आव्हान त्यांनी या वेळी पेलताना नव्याने विकासाचे व्हीजन पुढे आणले.
शिवसेनेवर भावनिक राजकारणाचा आरोप करताना त्यांच्यामुळे शहराचा विकास ठप्प झाल्याचा त्यांचा दावा, व त्यासमवेत त्यांनी मांडलेले विकास व्हीजन मतदारांना भावले. या विकास व्हीजनच्या माध्यमातून नगर शहराची नवी इमेज बिल्टअप करण्याची त्यांची मनीषा मतदारांचा विश्वास मिळवून गेली.
दीड-दोन वर्षांपूर्वीच्या केडगाव हत्याकांड व एसपी ऑफिस तोडफोड प्रकरणानंतर बॅकफूटवर जावे लागल्याने जगतापांचे राजकीय अस्तित्व पणाला लागले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत डॉ. विखेंसमोर उभे ठाकल्यावर व त्या निवडणुकीत पराभव झाल्यावर समर्थकांमध्ये अस्वस्थता होती. पण समर्थकांना विश्वास देताना स्वतः जिद्दीने त्यांनी फिनिक्स झेप घेतली.
एकीकडे विरोधकांकडून टीकाटिपण्णी होत असताना व दुसरीकडे पक्षांतर्गत विरोधकही तुटून पडण्याच्या प्रयत्नात असताना या सर्वांना पुरून उरत जगतापांनी मारलेली बाजी शहरात नवा इतिहास घडवून गेली. ‘संग्राम वन्समोअर’ स्लोगन प्रत्यक्षात आले आहे. तसे आता विकास व्हीजन प्रत्यक्षात येण्याची प्रतीक्षा नगरकरांना असणार आहे.