सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती, व त्या निवडणुकीत नगर शहरात ते तब्बल ५५ हजाराने पिछाडीवर पडले होते. त्यांची राजकीय कारकीर्द ओहोटीला लागल्याचे बोलले गेले.
पण ही इष्टापत्ती समजून व विधानसभा निवडणुकीतील संभाव्य धोक्याची घंटा लक्षात घेऊन त्यांनी तेव्हापासूनच पुन्हा शहरात ताकद पणाला लावली. सावेडी, बालिकाश्रम रोड, नागापूर, बोल्हेगाव, बुरुडगाव रोड, सारसनगर, केडगाव या उपनगरी पट्ट्यातील आपली ताकद आधी मजबूत केली, व नंतर मध्य शहरात लक्ष केंद्रीत करून येथील शिवसेनेच्या वर्चस्वाला खिंडार पाडले.
कोणताही गाजावाजा न करता त्यांनी चार महिने अथक परिश्रम घेतले. या दरम्यान एमआयडीसीतील १९ वर्षांपासूनच्या बंद आयटी पार्कची जाळेजळमटे दूर केली, त्याचे नूतनीकरण केले व तेथे ८-९ कंपन्या आणून चारशे ते पाचशेजणांचा रोजगार सुरू करून दिला.