कांदा निर्यातबंदी अखेर मागे ! शेतकऱ्यांना दिलासा ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी

Ahmednagarlive24
Published:
Onion News

Onion Export News : पंजाब व हरियाणासह उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे विराट आंदोलन व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा दिला आहे.

मागील दोन महिन्यांपासून कांद्यावर असलेली निर्यातबंदी सरकारने रविवारी मागे घेतली आहे. यासोबतच ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास सरकारने मंजुरी दिली.

तसेच शेजारील बांगलादेशला ५०,००० टन कांदा निर्यात करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीगटाची बैठक राजधानी नवी दिल्लीत पार पडली.

यावेळी देशातील कांदा उपलब्धतेचा आढावा घेतल्यानंतर कांदा निर्यातबंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मंत्रीगटाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी माध्यमांना दिली.

या निर्णयाची अधिकृत सूचना लवकरच काढण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. कांदा निर्यातबंदीची मुदत ३१ मार्च २०२४ होती. मात्र, ही मुदत संपण्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने निर्यातबंदी मागे घेतली आहे.

गुजरात आणि महाराष्ट्रात सध्या कांदा पुरेशा प्रमाणावर उपलब्ध आहे. याबाबत केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी गृहमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली.

त्यानंतर विचारविमर्श करून कांद्यावरील बंदी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष बाब अशी की, देशात गेल्या डिसेंबर महिन्यात कांद्याचे भाव १०० रुपये किलोपर्यंत वाढले होते.

त्यामुळे सर्वांनाच कांद्याने चांगलेच रडवले होते. कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी सरकारने कांदा निर्यातबंदीचे पाऊल उचलले. त्यामुळे कांद्याचे दर कमी झाले व देशात मुबलक प्रमाणावर कांदा उपलब्ध झाला.

बफर स्टॉकमधून २५ रुपये प्रति किलो दराने कांदा विकण्याचे निर्देश सरकारने दिले. परिणामी सर्वाधिक कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात दर घसरले व विविध राज्यांत कांद्याचा पुरवठा सुरळीत झाला.

बाजारपेठेत कांद्याची आवक चांगली असल्यामुळे त्याचे दर नियंत्रणात आहेत. सध्या बाजारपेठेत कांद्याचा तुटवडा नाही. त्यामुळे सरकारने कांदा निर्यातबंदी हटवली आहे.

पंजाब-हरियाणा व उत्तर भारतातील शेतकऱ्यांनी शेतमालाला ‘किमान हमीभाव’ (एमएसपी) मिळावा म्हणून उपोषण सुरू केले. अशातच सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी हटवत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe