बाजारात कांद्याचे दर तेजीत, असे आहेत किलोचे दर…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- सरकारने कांदा निर्यातबंदी उठविली असली, तरीही निर्यात अपेक्षेएवढी होत नसल्याने निर्यातबंदी उठवल्याचा कोणताही परिणाम कांदा दरावर झालेला नाही.

आजही किरकोळ बाजारात एक किलो चांगल्या कांद्याची विक्री ४० ते ५० रुपये किलो दराने केली जात आहे. तर प्रतवारीला हलका असलेल्या लाल कांद्याची विक्री २५ ते ३० रुपये किलो दराने केली जात आहे. विशेष म्हणजे नाशिक, वाशी, तसेच पुण्यातील बाजार समित्यांच्या आवारात कांद्याची मोठी आवक होत असली तरी दर मात्र तेजीतच आहेत.

गतवर्षी कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा दर मिळताच केंद्र सरकारने दि. १४ सप्टेंबर २०२० पासून कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कांदा प्रश्नावर नाशिकसह महाराष्ट्रात मोठी आंदोलने झाली होती. त्यानंतर दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन पेटलेले असताना केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेत त्याचा शासन निर्णय काढला.

त्यानंतर कांदा निर्यात चांगली होइल अशी अपेक्षा होती; पण महिनाभरात अवघी २० हजार मेट्रिक टन निर्यात झाली आहे. कांदा निर्यात अपेक्षेएवढी होत नसल्याने निर्यातबंदी उठवल्याचा कोणताही परिणाम कांदा दरावर होत नसल्याचे दिसत आहे. आजही स्थानिक किरकोळ बाजारात कांद्याचे दर तेजीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment