देशात UPI अर्थात डिजीटल पेमेंट सेवा सुरु झाल्यानंतर ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. अगदी छोट्या-मोठ्या दुकानांतही याच स्वरुपाचे पेमंट होऊ लागले. सुट्या पैशांचे वांधे असल्याने, अगदी छोटे दुकानदारही ही सेवा आपल्या दुकानांत पुरवू लागले. परंतु आता याच व्यवहाराचे तोटे काही व्यावसायिकांना वेगळ्या पद्धतीने बसू लागले. त्यातल्या त्यात मोठ्या व्यवहार करणाऱ्यांना लाखोंचा फटका बसू लागला. आता अनेक शहरांतील पेट्रोल पंपावर डिजीटल पेमेंट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नेमकं काय झालं?
विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने पेट्रोल पंपवर डिजिटल पेमेंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 10 मे पासून हा निर्णय लागू होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवार 10 मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे आता ग्राहकांना पेट्रोल-डिझेल घ्यायचे असेल तर रोख पैसे द्यावे लागणार आहेत.

कशामुळे घेतला निर्णय?
सध्या देशभरात सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्यानंतर महाराष्ट्रात 10 दिवसांत 10 लाख सायबर फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले. या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने हा निर्णय घेतलाय. सद्यस्थितीत देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र, याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात. काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे.
पेट्रोल पंपचालक आक्रमक
पेट्रोल पंपवर दररोज हजारो डिजिटल व्यवहार होतात. पंपावर आलेला ग्राहक कोणत्या खात्यातून पैसे पाठवत आहेत, याची माहिती पंप चालकांना शक्य नाही. काही बनावट व्यवहारांमुळे पंप चालकांच्या खात्यांतील लाखो रुपयांची रक्कम बँकांनी गोठवली आहे. काही प्रकरणांमध्ये तर संपूर्ण बँक खातीच गोठवण्यात आली आहेत. ही रक्कम परत मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची आहे. सायबर क्राइम विभागाकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. या समस्येचे लवकरात लवकर समाधान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट बंद करण्याचा विचार संघटना करत आहे, असं सांगण्यात आले आहे.