अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लग्न समारंभ आणि साखरपुडा यासारख्या धार्मिक समारंभाचे आयोजनास संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्यांची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत.
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अशा प्रकारच्या कार्यक्रम, समारंभानंतर कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. याशिवाय, जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार दिनांक २९ मार्चपासून ते १५ एप्रिल, २०२१ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी आज यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम १८९७ मधील तरतूदीनुसार भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात विवाह समारंभास जास्तीत जास्त ५० व्यक्तींना एकत्र येण्यास परवानगी आहे. मात्र, लग्न समारंभ असलेले मंगल कार्यालये, लॉन्स, मॅरेज हॉल, आणि इतर समारंभाचे ठिकाणी ५० व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्तीउपस्थित राहणे,
सोशल डिस्टंन्सिंग, गर्दीचे व्यवस्थापन, समारंभ ठिकाणचे निर्जतुकीकरण, उपस्थित व्यक्तींसाठी सॅनिटायझरची व्यवस्था, ऑक्सीमीटरची व्यवस्था या व अन्य कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणार्या मंगल कार्यालयांना १० हजार रुपये दंड करण्यात येत आहे.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने त्याला प्रतिबंध करण्यासाठी आता लग्न समारंभ, साखरपुडा या सारख्या धार्मिक समारंभ आयोजनास आता संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी यांची पूर्वपरवानगी बंधनकारक करण्यात आली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|