Pune Metro Latest Update : पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट व्हावी यासाठी मेट्रोची पायाभरणी करण्यात आली. लोकांनी खाजगी वाहनांचा वापर सोडून अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी मेट्रोचे जाळे विणले जात आहे. सध्या शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यापैकी पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी हा मेट्रोमार्ग वाहतुकीसाठी सुरू आहे.
यातील पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट मार्गाचा बाकी राहिलेला भाग म्हणजेच सिविल कोर्ट ते स्वारगेट हा संपूर्ण भूमिगत मार्ग येत्या काही महिन्यांनी वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. खरे तर हा पुण्यातील पहिलाच भूमिगत मेट्रो मार्ग राहणार आहे. यामुळे याकडे पुणेकरांचे लक्ष आहे.
दरम्यान आता पुण्यातील या मेट्रो मार्गांचा विस्तारही केला जाणार आहे. मेट्रो लाईन एक म्हणजेच पर्पल लाईनचा कात्रज पर्यंत विस्तार होणार आहे. स्वारगेट ते कात्रज दरम्यान विस्तारित मेट्रो मार्ग तयार होणार आहे. या प्रकल्पाला नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने मंजुरी सुद्धा दिली आहे.
या प्रकल्पाला मंजुरी मिळाली खरी मात्र याचे काम कधी सुरु होणार, हा प्रकल्प सर्वसामान्य पुणेकरांसाठी वाहतुकीसाठी कधीपर्यंत दाखल होणार असे अनेक प्रश्न सर्वसामान्य पुणेकरांच्या मनात आहेत. दरम्यान आज आपण याच प्रश्नांचे उत्तर थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रकल्पाची पुढील प्रक्रिया कशी राहणार आहे याबाबत आता आपण माहिती पाहणार आहोत.
कशी असणार पुढील प्रक्रिया
स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्ग प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळाली असल्याने येत्या दहा दिवसात यासाठी टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे. टेंडर प्रसिद्ध झाल्यानंतर इच्छुक कंपन्या यासाठी टेंडर भरतील. यातून मग सर्वात कमी बोली लावणाऱ्या पात्र कंपनीची निवड होईल.
साधारणता टेंडर निघाल्यानंतर वीस दिवसांनी पात्र कंपनीची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर मग संबंधित कंपनीकडून प्रत्यक्षात या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाईल. यासाठी त्यांना काही पूर्वतयारी करावी लागणार आहे, ज्यासाठी दोन-तीन महिन्यांचा काळ लागतो. या प्रकल्पासाठी जवळपास तीन साडेतीन महिन्यांपूर्वीच भू सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.
हा एक भूमिगत मेट्रो मार्ग असून कंपनीची निवड झाल्यानंतर लगेचच याचे काम करता येणे शक्य होणार आहे. म्हणजेच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाचे काम सुरू होऊ शकणार आहे. यासाठी 2954 कोटी 53 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रो मार्गाची लांबी 5.46 किलोमीटर एवढी राहणार असून यावर स्वारगेट, मार्केटयार्ड (सिटीप्राइड थिएटरजवळ), बालाजीनगर (स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ) आणि कात्रज हे चार स्थानके असतील. अर्थातच तीन नवीन स्थानक तयार होणार आहेत.