वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आणि कृषी व औद्योगिक क्षेत्राला देखील चालना मिळेल अशी अनेक प्रकल्प महाराष्ट्रमध्ये राबवले जात आहेत व यामध्ये अनेक महामार्गांचे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत व मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये रिंग रोड तसेच उड्डाणपुले, महत्त्वाचे कॉरिडॉर यांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत.
या सगळ्या प्रकल्पांना गती मिळावी याकरिता आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या जात असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये अनेक प्रकल्पांचे काम मार्गी लागेल व काही प्रकल्पाच्या कामांना वेग येईल अशी शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प राबवले जात आहेत
त्यामध्ये विरार ते अलिबाग हा एक कॉरिडॉर महत्त्वाचा असून या सोबतच पुणे रिंग रोड व होऊ घातलेला जालना ते नांदेड महामार्ग यांचा आपल्याला समावेश करता येईल. या तीनही प्रकल्पांसाठी आता टेंडर प्रक्रिया राबवली जात असून तब्बल 82 टेंडर कंपन्यांच्या माध्यमातून तिन्ही प्रकल्पातील 26 टप्प्यांसाठी टेंडर भरण्यात आलेली आहेत.
विरार–अलिबाग कॉरिडॉर आणि त्याचे महत्त्व
हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून एमएसआरडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. याकरिता 33 टेंडर भरण्यात आलेली आहेत व या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्पा हा नवघर ते चिरनेर हा 96 किलोमीटरचा असून या मार्गाच्या अकरा पॅकेजेच्या उभारणी करिता तब्बल 19 हजार 334 कोटी रुपयांचे टेंडर आहे.
हा कॉरिडॉर प्रामुख्याने मुंबई महानगर प्रदेशातील जी काही वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे तो सुटावा त्यासोबतच विरार व अलिबाग या दोन ठिकाणांमधील अंतर कमी व्हावे याकरिता उभारला जात असून तो 128 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यात 96 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचा प्रारंभ बिंदू हा वसईतील बापाणे या गावात आहे तर शेवटचे टोक हे उरण मधील चिरनेर आहे.
तसेच विरार ते अलिबाग कॉरिडॉर मुंबई ते अहमदाबाद महामार्गाला जोडण्यात येणार आहे व यामध्ये आठ इंटरचेंज, 28 वाहन अंडरपास,सोळा पादचारी अंडरपास असून संपूर्ण मार्ग आठ पदरी आहे व त्यासाठी 21 उड्डाणपूल, पाच टनेल, 40 मोठे आणि 32 छोटे पूल देखील प्रस्तावित करण्यात आलेले आहेत.
याचे काम पूर्ण झाल्यानंतर ग्रोथ सेंटर, एमआयडीसी, वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उरण पनवेल आणि नवी मुंबई या महानगरांसह जवाहरलाल नेहरू पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना खूप मोठा फायदा होणार आहे.
या टेंडर प्रक्रियेत या कॉरिडॉर ऐवजी या प्रकल्पांचा आहे समावेश
तसेच या व्यतिरिक्त समृद्धी महामार्गाचा विस्तार जालना ते नांदेड पर्यंत केला जाणार असून याकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून 190 किलोमीटर लांबीचा जालना ते नांदेड मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पुणे रिंगरोड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
व हा 136 किलोमीटरचा रस्ता असणार आहे. त्यामुळे या तीनही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांकरिता आर्थिक टेंडर गुरुवारी खुली करण्यात आली असून यामध्ये 18 कंपन्यांनी या तिन्ही प्रकल्पातील जवळपास 26 टप्प्यांकरिता 82 टेंडर भरली असून या सगळ्या टेंडरची छाननी करून ते अंतिम करण्यात येणार आहेत. साधारणपणे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जून मध्ये संपल्यानंतर ही टेंडर अंतिम करण्यात येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.