संपूर्ण महाराष्ट्रमध्ये गेल्या मान्सून कालावधीमध्ये सरासरीपेक्षा देखील बऱ्याच ठिकाणी कमी पाऊस झाल्याने राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची स्थिती आहे. त्यामुळे या परिस्थितीचा विपरीत परिणाम हा कृषी क्षेत्रावर बघायला येत असून राज्यातील महत्त्वाच्या धरणांमध्ये देखील पाणीसाठा कमालीचा घटलेला आहे.
त्यामुळे येणाऱ्या दिवसात पिण्याच्या आणि जनावरांसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवेल की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलले जात आहेत. जर राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याचा विचार केला तर त्यामध्ये कमालीचे घट झालेली असून पाणीटंचाईचे संकट गडद होईल अशी शक्यता आहे.
आपल्याला उदाहरणच घ्यायचे झाले तर जायकवाडी धरणात सध्या अवघा 39.84% तर उजनी धरण हे चक्क 0.65 टक्क्यांवर पोहोचले आहे. यावरून आपल्याला येणाऱ्या कालावधीतील संभाव्य पाणी टंचाईची स्थिती कळू शकते.
बीड जिल्ह्यातील काही धरणातील पाणीसाठा
आपण मराठवाड्यातील बीड जिल्ह्याचा विचार केला तर त्या ठिकाणी असलेल्या मांजरा धरणामध्ये 16.26% इतका पाणी साठा सध्या शिल्लक असून माजलगाव धरणामध्ये 6.07% पाणीसाठा शिल्लक आहे.
हिंगोली जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा
जर आपण हिंगोली जिल्ह्यातील धरणांचा विचार केला तर या ठिकाणी महत्त्वाच्या असलेल्या सिद्धेश्वर धरणामध्ये अवघा 29.94% इतका पाणीसाठा असून येलदरी धरणामध्ये 56.94% पाणी शिल्लक राहिले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा
धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी असलेल्या तेरणा या धरणामध्ये 11.04% इतका पाणीसाठा सध्या शिल्लक असून या ठिकाणचे सीना कोळेगाव धरण तर शून्यावर गेले आहे.
परभणी जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा
मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात असलेल्या निम्न दुधना धरणामध्ये अवघा 16.57% पाणीसाठा शिल्लक आहे.
काय आहे मध्य महाराष्ट्रातील धरणांची स्थिती?
आपण मध्य महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक महत्त्वाचे धरणे आहेत व त्या ठिकाणी असलेल्या धरणाचा जर आपण पाणीसाठा पाहिला तर नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 62.73% इतके पाणी शिल्लक आहे. दारणा धरणांमध्ये 51.96% पाणीसाठा शिल्लक असून जळगाव जिल्ह्यासाठी महत्त्वाचा असलेल्या गिरणा धरणामध्ये 42.01 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणामध्ये सध्या 68.47% पाणीसाठा शिल्लक आहे.
पुणे जिल्हा
पुण्यातील डिंभे धरण सध्या 69.35% भरले असून पवना धरणामध्ये 57.76 तर पानशेत धरणात 78.49% पाणीसाठा शिल्लक आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोयना धरणामध्ये सध्या 70.62% पाणीसाठा शिल्लक आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणामध्ये 74.86% इतके पाणी शिल्लक आहे.