कुजलेले धान्य आंदोलकांनी पाठवले मुख्यमंत्री ठाकरेंकडे !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय दोन दिवसांत न घेतल्यास शासकीय अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्यात येईल, असा इशारा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी आमदार वैभव पिचड यांनी बुधवारी दिला.

कुजलेले धान्य मुख्यमंत्र्यांना पाठवत कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. रेशनकार्डवर धान्य मिळत नाही, नुुकसानीचे पंचनामे होत नाहीत,

दोषी रेशन दुकानदारांवर निलंबनाची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही तहसील कार्यालयाच्या बाहेर जाणार नाही, असा पवित्रा पाचनई, पेठ्याचीवाडी येथील ग्रामस्थांनी घेतल्याने हे आंदोलन पाच तास चालले.

तीन महिन्यांपासून आदिवासी भागातील रेशन दुकानातील धान्य गायब झाले आहे. आम्ही काय पेंढा खायचा का? शेतातील धान्य अवकाळी पावसाने सडून, कुजून गेले. अद्याप त्यांचे पंचनामे नाहीत, असे यावेळी सांगण्यात आले.

सरपंच गोविंदा घोगरे यांनी सांगितले, गेल्या तीन महिन्यांपासून मोदी साहेबांचे ५ किलो तांदूळ सोडले, तर काहीच धान्य मिळाले नाही. अस्मानी संकट आल्याने भातपीक नष्ट झाले. रेशन दुकानदार धान्य देत नाही.

कुजलेले धान्य प्लास्टिक पिशवीत आणून ते तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना देऊन मुख्यमंत्र्यांकडे पाठवून त्याची भाकरी करून खाण्याचा सल्ला देत आम्हा गरिबांना न्याय मिळेल काय, अशी विचारणा त्यांनी केली.

दोन दिवसांत पेठेवाडी येथे धान्य पाठवतो, पंचनामे करण्यात येतील, अशी लेखी हमी नायब तहसीलदार विनोद गिरी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment