अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- संत कैकाडी बाबांचे पुतणे आणि येथील संत कैकाडी महाराज पुण्यधाम मठाचे विश्वस्त, प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. रामदास महाराज कैकाडी (जाधव) (वय 77) यांचे कोरोनामुळे निधन झाले.
त्यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायामध्ये शोककळा पसरली आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर अकलूज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 25) दुपारी त्यांचे निधन झाले. मनमाड हे त्यांचे मूळ गाव होते.
वारकरी सांप्रदायामध्ये त्यांना मानाचे स्थान होते. संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांची नितांत श्रद्धा होती. संत गाडगेबाबा आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा त्यांच्यावर मोठा पगडा होता. समाजातील अंधश्रद्धा, बुवाबाजी याविषयी ते आपल्या कीर्तनातून परखडपणे मत मांडत असत.
बहुजन समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी तळमळीने काम केले. संत तुकाराम महाराज बीजेच्या निमित्ताने देहू ते पंढरपूर अशी विठ्ठल पालखी रथ सोहळ्याची परंपरा त्यांनीच सुरू केली होती. राष्ट्रसंत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रसंत कैकाडी महाराज यांच्या विचार आणि प्रबोधनाचा वारसा गेली पाच दशके सक्षमपणे चालवताना
रामदास महाराज यांनी अंधश्रद्धा, जादूटोणा आणि कर्मकांडावर आसूड ओढले. जगत्गुरू संत तुकाराम महाराज यांचे जीवन, चरित्र आणि गाथा यांचा सध्या सोप्या भाषेत प्रचार, प्रसार करताना त्यांनी महाराष्ट्रातील एकही गाव सोडले नाही. संत तुकाराम महाराज यांचे विचारच जगाला तारू शकतात असा विश्वास त्यांनी जनामनात रुजवला.
तुकाराम महाराजांचे चरित्र विकृतपणे समाजापुढे मांडणारांचा त्यांनी वेळोवेळी चांगलाच समाचार घेतला. स्पष्टवक्तेपणा आणि सोपी भाषा यामुळे त्यांच्या किर्तनांना हजारो भाविक उपस्थित असायचे. वाईट रूढी परंपरा यांच्या विरोधात त्यांनी जनआंदोलन पुकारले होते.
गरीब, अपंग, कुष्ठरोगी आणि निराधार लोकांच्या सेवेसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या मठामध्ये आजही अन्नदान सेवा सुरू आहे. त्यांनी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अनेक वर्षे सदस्य म्हणून काम पाहिले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved