जनावरे चोरणाऱ्या चोरट्यांकडून गोळीबार; या ठिकाणी घडला धक्कादायक प्रकार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी व कुचकामी प्रशासन यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लुटमारी, चोरी, मारहाण आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे.

नुकतीच जिल्ह्यातील एका ठिकाणी जनावरांची चोरी करणाऱ्या चोरटयांनी गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

शेळ्या चोरुन चार चाकी वाहनातून पळ काढणाऱ्या चोरट्यांच्या वाहनाला अपघात घडला. या दरम्यान, ग्रामस्थांनी पाठलाग केला. यावेळी चोरटे हवेत गोळीबार करुन फरार झाले.

ही घटना शेवगाव तालुक्यातील शेकटे खुर्दनजीक गुरुवारी (१५ ऑकटोबर) मध्यरात्री घडली. शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव येथील मधुकर सदाशिव पाटील (वय ४०) या शेतकऱ्याच्या घराजवळील पत्राशेड मध्ये बांधलेल्या दोन शेळ्या चोरट्यांनी चोरल्या.

यावेळी शेळ्यांच्या ओरडण्याने शेजारीच असलेले काहीजण उठले व आरडाओरड केली. तेव्हा चोरट्यांनी शेळ्यांसह गाडीतून घोगस पारगाव रस्त्याने पळ काढला.

दरम्यान, लाडजळगाव ग्रामस्थांनी घोगस पारगाव येथील काही नागरिकांना फोनवरून याबाबत कल्पना दिली. पारगावच्या ग्रामस्थांनी तात्काळ बैलगाड्याने रस्ता अडवला.

ते पाहून चोरटे पुन्हा माघारी फिरले. तोपर्यंत लाडजळगाव येथील ग्रामस्थ शेकटे खुर्द याठिकाणी खडी क्रेशरनजीक रस्त्याच्या दुतर्फा दबा धरून बसले होते.

चोरटे येताच गावकऱ्यांनी गाडीच्या दिशेने दगडफेक केली. चोरट्यांनी देखील हवेत फायर करून गाडी तलावाच्या कच्च्या रस्त्याने घातली. परंतु अंधारामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने सदरील गाडी उलटली.

ग्रामस्थ पोहचेपर्यंत चोरट्यांनी त्या ठिकाणहून पळ काढला. गाडीमध्ये चार शेळ्या आढळून आल्या. त्यापैकी एक शेळी मृत झाली होती. दरम्यान चोरट्यांच्या या धाडसामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment