दलित अत्याचारग्रस्त तालुका म्हणून श्रीगोंदे घोषित करण्याची गरज !

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे :- दलित, आदिवासींवरील वाढत्या अत्याचारांच्या घटना लक्षात घेता श्रीगोंदे तालुका हा दलित, आदिवासी अत्याचारग्रस्त तालुका म्हणून घोषित करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा घटनांकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे झालेले दुर्लक्ष ही आणखी चिंताजनक बाब आहे.

महिलांना नग्न करून मारहाण करणे, बलात्कार, लहान मुलांवर धारदार शस्त्रांनी वार, प्राणघातक हल्ला अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. ढवळगाव येथील जनाबाई बोरगे जळितकांडाचे पडसाद राज्यभर उमटले.

लिंपणगाव येथील आदिवासी, पारधी व मुस्लिम समाजाच्या झोपड्या गावकऱ्यांनी जाळल्या. चिंभळा गावातील लक्ष्मीबाई आढागळे या वृद्ध मातंग महिलेचा अंत्यविधी जातीयवाद्यांनी रोखला. याच गावातील मागासवर्गीय अल्पवयीन मुलीचे अत्याचाराचे प्रकरण,

तांदळी येथील अल्पवयीन मातंग मुलीवरील सामूहिक अत्याचार, बेलवंडी येथील शिक्षणात हुशार असलेल्या दशरथ काळे या आदिवासी मुलाला बारावीच्या परीक्षेची फी भरली नाही, म्हणून परीक्षेस बसू दिले गेले नाही. बेलवंडी येथील आदिवासी समाजाच्या मुलाने लिंबे तोडली म्हणून बाजारातून नग्न धिंड काढून तोंडातील दात पडेपर्यंत मारहाण करण्यात आली.

भानगाव येथील आदिवासी महिलेची शेळी सवर्णाच्या शेतात गेली याचा राग अनावर होऊन तिला नग्न करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. ५ सप्टेंबरला अत्याचाराच्या घटनेने कळस गाठला. भानगाव येथील गणेश काळकुशा काळे या दोन वर्षांच्या मुलाचा भांडणात बळी गेला.

जमिनीचा वाद विकोपाला जाऊन शेजारच्या आघाव यांनी काळे कुटुंबावर हल्ला केला. मुलाच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घालून त्याला जीवे मारण्यात आले. त्याच्या आई-वडिलांवर गज, खोऱ्याच्या दांड्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयास केला गेला. गणेशचे वडील काळकुशा यांचे दोन्ही हात पाय फॅक्चर झाले आहेत. जातीवाचक शिवीगाळ करत काळे कुटुंबाला संपवण्याच्या प्रयत्न केला गेला.

श्रीगोंदे तालुक्यातील प्रस्थापित पुढाऱ्यांनी या गंभीर घटनेची अजून साधी चौकशीही केलेली नाही. यावरून तालुक्यात दलित, आदिवासींची न्यायाची झुंज एकाकी असल्याचे समोर येत आहे. अन्याय, अत्याचारांचा वाढता आलेख लक्षात घेता श्रीगोंदे तालुका हा नगर जिल्ह्यातील दलित आदिवासी अत्याचारग्रस्त तालुका असल्याचे समोर येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment