State Government Employees:- केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत म्हणजेच जे कर्मचारी सातव्या वेतन आयोग अंतर्गत वेतन किंवा इतर लाभ घेतात त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये नुकतीच काही दिवसांपूर्वी चार टक्क्यांची वाढ केली असून तो आता 46 टक्के करण्यात आला आहे.
त्यापाठोपाठ केंद्र सरकारच्या माध्यमातून पाचव्या व सहाव्या वेतन आयोगांतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील वाढ करण्यात आली. त्या पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्य सरकारने देखील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकरिता महत्वाच्या असलेल्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयाचा कसा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे? यासंबंधीची महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात चार टक्क्यांची वाढ
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नुकतीच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. केंद्र सरकार प्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये एक जुलैपासून चार टक्क्यांची वाढ करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आलेली होती
व त्यानुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा एक जुलैपासून 42 टक्क्यांवरून 46 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. या निर्णयाचा फायदा पाहिला तर उपलब्ध माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी पेन्शनधारक म्हणजेच निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना महागाई भत्ताचा वाढीचा लाभ घेता येणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या पगारात व निवृत्तीवेतनधारकांच्या वेतनात किती पडेल फरक?
महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला व त्याचा शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे. यामुळे आता जुलै ते ऑक्टोबर 2023 या चार महिन्यांच्या थकबाकी सह नोव्हेंबरच्या वेतनामध्ये या वाढीव महागाई भत्त्याची रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केलेल्या चार टक्क्यांच्या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कमीत कमी 1000 रुपये तर अधिकारी श्रेणीवरील जे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारांमध्ये कमीत कमी तीन हजार रुपयांची वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांप्रमाणेच निवृत्तीवेतनधारकांना देखील या निर्णयाचा खूप मोठा फायदा मिळणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सरकारी निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना या महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असून त्यांच्या मूळ निवृत्तीवेतनाची जी काही एकूण रक्कम आहे त्या रकमेवर एक जुलैपासून चार टक्के महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर तब्बल दोनशे कोटींचा बोजा येणार असल्याचे देखील माहिती समोर आली आहे.
हा निर्णय कोणाला लागू राहील?
महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय मान्यता आणि अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी आणि कृषीइतर विद्यापीठ, संलग्न अशासकीय महाविद्यालय आणि तेथील निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक इत्यादींना लागू असणार आहे.