नगर शहराचा पुन्हा एकदा बिहार झाला आहे. ही मालिका थांबायला तयार नाही

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- नगर शहराचा पुन्हा एकदा बिहार झाला आहे. ही मालिका थांबायला तयार नाही.

प्रतिष्ठित व्यापारी असणाऱ्या भळगट कुटुंबीयांना शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या बड्या नेत्याचा राजकीय वरदहस्त असणाऱ्या सराईत गुंडांकडून दिवसा ढवळ्या घरात घुसत घरातील पुरुषांसह स्त्रियांना झालेली मारहाण ही नगर शहरवासीयांसाठी अत्यंत लांछनास्पद आणि संतापजनक असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.

काळे यांनी काल रात्री उशिरा काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह भळगट कुटुंबीयांची त्यांच्या निवस्थानी समक्ष भेट घेत व्यथा जाणून घेतली. यावेळी सुनील भळगट, सुशीलकुमार भळगट, शुभम भळगट यांनी घटनेची हृदयद्रावक हकीकत काळे यांना सांगितली.

याबाबत काळे यांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली असून व्यापाऱ्यांनी भयभीत होऊ नये असे आवाहन केले आहे. आपण नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची समक्ष भेट घेणार असून नगर शहरातील राजकीय वरदहस्ताने चालणाऱ्या गुंडगिरीचा समूळ नायनाट करण्यासाठी भूमिका मांडणार असल्याचे काळे यांनी सांगितले आहे.

काळे म्हणाले की, गेल्या सहा – सात वर्षांपासून नगर शहरातील अशा प्रकारच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. भळगट कुटुंबीयांसोबत घडलेल्या घटनेमुळे नगर शहरातील बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. भळगट कुटुंबीयांवर आलेला हा प्रसंग शहरातील इतर कोणत्याही व्यापाऱ्यांच्यावरती येऊ शकतो.

किंबहुना तो अनेकांवर आलेला देखील आहे. परंतु दहशतीमुळे त्यांनी आवाज न उठवता तडजोड करत अन्याय सहन केला आहे.मात्र या संघटित भूमाफियांच्या विरुद्ध समाजाने देखील संघटितपणे आवाज उठविला पाहिजे. शहरातील व्यापारी, उद्योजक, सामान्य नागरिक यांच्या पाठीशी शहर काँग्रेस भक्कमपणे उभी राहील, असे काळे यांनी म्हटले आहे.

भळगट कुटुंबीयांमधील हा प्रॉपर्टीचा घरगुती वाद आहे. मात्र राजकीय गुन्हेगारीची पार्श्वभूमी असणारे पंटर भळगट कुटुंबियांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचा राजकीय संघटित गुंडगिरीच्या जोरावर बेकायदेशीररित्या ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी बाजारपेठेत दहशत निर्माण केली जात असल्याचा घणाघाती आरोप काळे यांनी केला आहे.

काँग्रेस भळगट कुटुंबीय आणि व्यापाऱ्यांना देणार संपूर्ण संरक्षण :- काळे यांनी आडते बाजार, दाळ मंडई, कापड बाजारासह शहरातील व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी घाबरून जावू नये. शहर काँग्रेस त्यांच्या पाठीशी खंबीपणे उभी आहे. नगर शहराला दहशतमुक्त करत भळगट कुटुंबीयांना आणि

व्यापाऱ्यांना संपूर्ण संरक्षण देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. अशा प्रकारचा प्रसंग उद्भवल्यास व्यापाऱ्यांनी थेट माझ्याशी माझ्या ९०२८७२५३६८ या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी आणि काँग्रेस पक्ष तात्काळ धावून येईल, असे काळे यांनी म्हटले आहे.

दिवंगत अनिलभैय्या राठोड यांच्या विचारांवर चालणार – काळे :- दिवंगत अनिलभैय्या राठोड हयात असताना या शहरामध्ये कुणावरही अन्याय झाला की ते धावून जात. आज ते हयात नाहीत, ही दुर्दैवी बाब आहे. मी अनिलभैय्या यांच्या निर्भिड व्यक्तिमत्त्वाला कायम आदर्श मानून आजवर काम करत आलो आहे.

नगर शहरात ज्या-ज्या वेळेला कुणावर अन्याय होईल, त्या-त्या वेळेला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी धावून जात अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी निर्भिडपणे नगरकरांच्या पाठीशी उभा राहील, असे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment