अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- ग्राहकांनी विजेचे बिल भरले नाही तर आक्रमक कारवाई करत ग्राहकाचे वीज कनेक्शन कट करून त्यांना अंधारात लोटणाऱ्या महावितरणालाच नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायतीने चांगलाच शॉक दिला आहे.
नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील 220 केव्ही वीज उपकेंद्राकडे असलेली 18 लाख 72 हजार 971 रुपयांची कर थकबाकी वसुलीसाठी सौंदाळा ग्रामपंचायतीने आज (दि.9 नोव्हेंबर) रोजी सौंदाळा वीज उपकेंद्राला सील ठोकले आहे.
सदर वसूल पात्र रक्कम सोमवार दि.9 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत वीज कंपनी कार्यालयाकडून थकीत कर जमा न झाल्यास सौंदाळा 220 केव्ही उपकेंद्र ग्रामपंचायतीकडून सील करण्याची नोटीस देण्यात आली होती.
परंतु वीज कंपनीने थकीत कर रक्कम न भरल्याने सरपंच, उपसरपंच, सदस्य मंडळी तसेच ग्रामविकास अधिकारी रेवन्नाथ भिसे आदी थकीत कर वसुलीसाठी गेले असता कार्यकारी अभियंता प्रशांत यादव ह्यांच्याशी चर्चा झाली.
सकारात्मक चर्चा न झाल्याने ग्रामपंचायतीने थकबाकी भरणे बाबदची लेखी हमी देण्याची मागणी केली असता अभियंता यादव यांनी नकार दिल्याने अखेर ग्रामपंचायतीने वीज उपकेंद्र सील केले आहे.
शेवगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मुंढे, नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिनव त्यागी आदी यावेळी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved