अहमदनगर :- जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षांची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे नव्या अध्यक्षपदाची सोडत आज मंगळवारी झाली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कुठल्या प्रवर्गाकडे जाणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचे लागले लक्ष लागले होते.
आज सकाळी ११ वाजता ग्रामविकास मंत्रालयात लकी ड्राॅ पध्दतीने अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत काढली गेली.
राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांसाठीचे आरक्षणाची सोडत :
* अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना
* अनुसूचित जाती (महिला) : नागपूर, उस्मानाबाद
* अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली
* अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती
* नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड
* खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा
* खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर
अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला आल्याने या प्रवर्गातील महीलेस अध्यक्षपदाची संधी आहे.
जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. अध्यक्षपद काँग्रेसच्या शालिनी विखे यांच्याकडे, तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीच्या राजश्री घुले यांच्याकडे आहे. सध्याच्या अध्यक्ष विखे काँग्रेसच्याच अध्यक्ष असल्या, तरी त्यांचे पुत्र हे भाजपचे खासदार व पती भाजपचे आमदार आहेत.
राजश्री घुले या राष्ट्रवादीच्या आहेत. जिल्हा परिषदेतील काँग्रेसची सदस्य संख्या सर्वाधिक आहे.
काँग्रेसची सदस्य संख्या जास्त असली, तरी काँग्रेसमधीलच काही सदस्य हे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे आहेत.
थोरात गटाचीदेखील भूमिका यात महत्त्वाची असणार आहे. सध्या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे २३, राष्ट्रवादी १९, भाजप १४ शिवसेना ७, क्रांतिकारी संघटना ५, भाकप १, अपक्ष ४ असे ७३ चे संख्याबळ आहे.