अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजीमंत्री राम शिंदे यांनी नगर जिल्ह्यात भाजपला झालेल्या नुकसानीची खंत व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राम शिंदे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा फायदा नव्हे तर तोटाच अधिक झाल्याचे म्हटले.
आज बैठकीनंतर राम शिंदे यांनी विखे पाटील यांच्याबद्दल थेट काही आरोप करत आपल्या भावना पत्रकारांशी बोलताना मांडल्या.
निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात आलेल्या अडचणींविषयी प्रदेश प्रतिनिधींकडे तक्रार केली आहे. जिल्ह्यात पूर्वी भाजपचे पाच आमदार होते.
विखे आणि वैभव पिचड आल्यानंतर ही संख्या 7 व्हायला हवी होती. मात्र प्रत्येक्षात ही संख्या तीनवर आल्याचे शिंदे म्हणाले.त्यामुळे विखे फॅक्टर काहीही उपयोगी पडला नसल्याचे शिंदे म्हणाले.
पाच वर्षे मंत्रीपद असूनही राम शिंदे यांना कर्जत-जामखेडमध्ये पराभव का पत्करावा लागला याचाही त्यांनी स्वत: विचार करण्याची गरज असल्याचं मत भाजपचे काही नेते खासगीत व्यक्त करत आहेत. राम शिंदे यांना कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांनी पराभूत केले होते.