अहमदनगर Live24 टीम,29 सप्टेंबर 2020 :- शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे.
मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सातत्याने होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिर्डी येथील साईबाबा मंदिर आगामी काळात भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यासाठीच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकारी तिरुपती येथे रवाना झाले होते.
तेथे तिरुपती संस्थानच्या प्रशासकीय अधिकार्यांबरोबर बैठक झाली. या बैठकीत देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव देण्यात आला
असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच. बगाटे यांनी दिली. या दौर्याकरिता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे,
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचा सहभाग होता. यावेळी तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष वाय.व्ही.सुब्बा रेड्डी, कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सिंघल, उप कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी व पदाधिकारी उपस्थित होते.
दर्शन खुले करत असताना मंदिर प्रशासनाची यंत्रणा, सुरक्षा कर्मचारी व भक्त यांचे आरोग्यदृष्ट्या सक्षम राहणे करिता करावयाच्या उपाय-योजनांची माहिती घेण्याकरिता तिरुमला तिरुपती देवस्थान येथे भेट देऊन
तेथील व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनरांग व्यवस्थापनबाबत माहिती घेतली.
तसेच देवस्थानला ऑनलाईन देणगी देताना भक्तांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी देशातील प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करून एकच वेबसाईट तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून
याबाबत आराखडा तयार करण्यावर चर्चा करण्यात आली. ही व्यवस्था शासनच्या मान्यतेनंतर सुरू करता येईल असे बगाटे यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved