CIBIL Score:- व्यक्तीला आयुष्यामध्ये अचानकपणे पैशांची गरज उद्भवते व ही गरज भागवण्यासाठी बऱ्याचदा कर्जाचा पर्याय निवडावा लागतो. परंतु जेव्हाही आपण बँका किंवा एखाद्या नॉन बँकिंग वित्तीय संस्थेकडे कर्जासाठी अर्ज करतो तेव्हा सगळ्यात अगोदर अशा प्रकारच्या वित्तीय संस्थांकडून आपला सिबिल स्कोर तपासला जातो.
जर तुमच्या सिबिल स्कोर उत्तम असेल तर तुम्हाला झटक्यात कर्ज मंजूर होते. परंतु या व्यतिरिक्त जर तुमचा सिबिल स्कोर घसरलेला असेल तर मात्र तुम्हाला कर्ज मिळण्यास समस्या निर्माण होतात किंवा कधी कधी तुमचा कर्जाचा अर्ज नामंजूर देखील केला जाण्याची शक्यता असते.

क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड ही एक क्रेडिट माहिती कंपनी असून या कंपनीला भारतीय रिझर्व बँकेच्या माध्यमातून परवाना देण्यात आलेला आहे व या परवानामुळे ही कंपनी लोकांच्या कर्जाशी संबंधित ज्या काही महत्वाच्या नोंदी किंवा बाबी असतात त्यांचा तपशीलवार मागोवा घेत असते व त्यानुसार संबंधित व्यक्तीला रेटिंग दिला जातो
व त्याला सिबिल स्कोर असे म्हणतात. सिबिल स्कोर हा साधारणपणे 300 ते 900 या आकडेवारीच्या दरम्यान गणला जातो. यामध्ये जर तुमचा सिबिल 300 ते 600 च्या दरम्यान असेल तर तुम्ही कर्ज परतफेड करण्यामध्ये फार वाईट किंवा सक्षम नाहीत असा त्याचा अर्थ होतो
आणि साडेसातशे ते 900 च्या दरम्यान सिबिल असेल तर तुमचा कर्ज परतफेडचा रेकॉर्ड चांगला आहे असे या माध्यमातून सूचित होते.
त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर जर घसरलेला असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. परंतु तुमच्या सिबिल स्कोर जर घसरलेला असेल तर त्यामध्ये सुधारणा देखील केली जाऊ शकते. त्यामुळे या लेखात दिलेल्या पाच मार्गांचा तुम्ही अवलंब केला तर तुमचा घसरलेला सिबिल सुधारू शकतो.
या पाच मार्गांचा अवलंब करा आणि घसरलेला सिबिल सुधारा
1- कर्जाची वेळेवर परतफेड करा– तुम्ही कर्ज घेतले असेल आणि त्याची परतफेड वेळेवर केली नसेल तर तुमचा सिबिल स्कोर घसरतो. त्यामुळे तुम्ही नियमितपणे घेतलेल्या कर्जाचा ईएमआय वेळेवर भरणे गरजेचे आहे.
2- चांगली क्रेडिट शिल्लक ठेवणे– तुमच्याकडे जर वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्ड यासारख्या असुरक्षित कर्जासह होमलोन आणि कारलोन यासारखे सुरक्षित कर्जाचे चांगले मिश्रण असणे गरजेचे आहे. बँका आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपन्यांच्या माध्यमातून जास्त करून सुरक्षित कर्ज असलेल्यांना प्राधान्य दिले जाते.
तुमच्याकडे जर जास्त प्रमाणामध्ये असुरक्षित कर्ज असेल तर चांगली क्रेडिट शिल्लक ठेवण्यासाठी ते प्रथम फेडणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केला असेल तर तुमच्या बिल देय तारखेपूर्वी भरण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे देखील तुमच्या घसरलेला सिबिल स्कोर झटक्यात सुधारू शकतो.
3- क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे– समजा तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर त्याचे बिल तुम्ही देय तारखेपूर्वी भरणे खूप गरजेचे आहे. क्रेडिट स्कोर म्हणजे सिबिल स्कोर सुधारण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.
4- एखाद्याला कर्जासाठी जामीनदार होण्याचे टाळावे– तसेच तुम्ही संयुक्त खाते उघडणे किंवा एखाद्याच्या कर्जाचे जामीनदार बनणे टाळणे गरजेचे आहे. अशा प्रकरणांमध्ये जर तुमच्या सोबत असलेल्या व्यक्तीने जर कर्जाचे हप्ते वेळेवर भरले नाहीत म्हणजेच तो डिफॉल्ट झाल्यास त्याचा विपरीत परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर देखील होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकाच वेळी अनेक प्रकारची काळजी घेऊ नये. दुसरे कर्ज घेण्या अगोदर पहिले घेतलेले कर्ज फेडण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे देखील तुमचा सिबिल स्कोर सुधारतो.
5- क्रेडिट कार्डचा वापर– समजा तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वापरत नसल्यास तुमचा क्रेडिट स्कोर लवकर सुधारू शकतो. प्रत्येक महिन्याला तुमच्या क्रेडिट कार्डचा जो काही लिमिट आहे त्या लिमिटच्या फक्त 30 टक्क्यांपर्यंत खर्च करावा. यापेक्षा जर तुम्ही जास्त खर्च केला तर तुम्ही विचार न करता पैसे खर्च करता व तुम्ही जास्त प्रमाणात कर्जावर अवलंबून आहेत असं त्या माध्यमातून सुचित होते. त्यामुळे क्रेडिट कार्डच्या 30% पर्यंतच फक्त खर्च करावा.
घसरलेला क्रेडिट स्कोर सुधारण्यासाठी किती वेळ लागतो?
जर तुम्ही घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केली आणि क्रेडिट कार्डच्या लिमिटच्या 30% पर्यंत खर्च केला तर तुमच्या क्रेडिट स्कोर चार ते 13 महिन्यात सुधारू शकतो. त्यामुळे तुम्ही पैसे खर्च करताना तो शिस्तीने करणे गरजेचे आहे.