Home Loan Tips:- स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व हे स्वप्न पूर्ण करण्याकरिता अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून बरेच जण बँकेकडून होमलोन घेऊन घर किंवा फ्लॅट खरेदी करतात व स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करतात.
आपल्याला माहित आहे की होम लोनचा कालावधी हा 20 किंवा 30 वर्षांपर्यंत असू शकतो व हे सगळे ईएमआय भरण्यासाठी आपले अर्ध आयुष्य खर्ची होते. परंतु या सगळ्या कालावधीमध्ये एक वेळ येते की आपण कर्जाचा शेवटचा हप्ता भरतो व आता आपले होमलोन संपूर्णपणे भरले गेले म्हणून निवांत होतो.
परंतु यामध्ये तुम्ही होमलोनची परतफेड जरी केली तरी तुम्ही निवांत न होता तुमचे अजून देखील काही काम पूर्ण झालेले नसते. होम लोन संपूर्णपणे फेडल्यानंतर देखील तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करणे गरजेचे असते. जर तुम्ही असे केले नाही तर मात्र काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे होम लोन चे सगळे हफ्ते भरल्यानंतर तुम्हाला कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी करणे गरजेचे आहे? याविषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.
होमलोन संपूर्णपणे भरल्यानंतर करा ही महत्त्वाची कामे
1- तुमची मूळ कागदपत्रे बँकेकडून परत मागवा– यामध्ये तुमची काही मूळ कागदपत्रे बँकेकडे शिल्लक आहेत का हे अगोदर तपासून घ्यावे. काही आवश्यक परिस्थितीमध्ये जेव्हा आपण कर्ज घेतो त्या अगोदर बँका काही कागदपत्रे सुरक्षा म्हणून त्यांच्याकडे ठेवतात.
यामध्ये जमीन नोंदणी तसेच पावर ऑफ ॲटर्नी, कर्जाचा करार तसेच विक्री करार, मालमत्तेचा नकाशा तसेच शीर्षक कृत्य इत्यादी कागदपत्र बँकेकडे असू शकतात त्यामुळे ही कागदपत्रे बँकेकडून परत मागवणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर ती कागदपत्रांमधील कुठली पाने गहाळ किंवा खराब जर झाली नाहीत ना हे देखील तपासून घ्यावे.
2- म्युटेशन नक्की करा– याबाबत तज्ञ म्हणतात की, जर तुमचे होमलोन बंद झाले असेल तर तुमच्या फायलिंग आणि रिजेक्शन सह वर नमूद केलेले कागदपत्रे अपडेट करणे खूप गरजेचे असते. या संबंधित दाखल व बडतर्फीची कारवाई तहसीलदार कार्यालयातून केली जाते
व त्यासाठी बँकेकडे पत्र देण्याची मागणी करणे गरजेचे असते. त्यामध्ये कर्ज बंद करून जमिनी घेण्याचा बँकेचा अधिकार काढून घेण्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे व त्यामुळे तुम्हाला भविष्यात जमीन खरेदी विक्री करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
3- बँकेकडून पोस्ट डेटेड चेक मागवणे– बँक कर्ज देते त्यावेळेस अनेक परिस्थितीमध्ये बँक आपल्याकडून पुढील देय तारखेसह काही चेक मागते. कारण जर एखादा ईएमआय चुकला तर बँका त्या चेकचा वापर करून त्यांचे पैसे वसूल करण्यासाठी करते. यामध्ये तुम्ही कर्ज परतफेड केली असेल व बँकांना तुम्ही दिलेले चेक वापरण्याची संधी मिळाली नसेल तर अशा परिस्थितीत ते पडलेले चेक बँकेकडून परत मागवणे गरजेचे आहे.
4- बँकेकडून नो ड्युज सर्टिफिकेट मागवणे– तुमच्याकडे बँकेचे या कर्जाशी संबंधित एक रुपया देखील बाकी नाही म्हणून तुम्ही होमलोन परतफेड केल्यानंतर बँकेकडून कोणतेही थकीत प्रमाणपत्र मागणी आवश्यक आहे. या प्रमाणपत्रांमध्ये कर्जदाराचे नाव, मालमत्तेचा पत्ता तसेच कर्ज खाते क्रमांक, कर्जाची रक्कम, कर्ज सुरू होण्याची तारीख आणि परतफेडीची तारीख इत्यादी गोष्टी नमूद असणे गरजेचे आहे.
5- संबंधित मालमत्तेवरून बँकेचे धारणाधिकार काढणे– जेव्हा आपण गृह कर्ज घेतलेले असते व हे कर्ज जर आपण भरू शकलो नाही तर बँक ते घर ताब्यात घेऊ शकते व तसा अधिकार त्यांना आहे.
बँकेचा हा अधिकार तुम्हाला भविष्यामध्ये घराची खरेदी विक्री व्यवहारांमध्ये अडथळा ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही होम लोन संपूर्णपणे फेडल्यानंतर तुमच्या मालमत्तेतून बँकेचा धारणाधिकार काढून टाकणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला बँक अधिकाऱ्यांसह निबंधक कार्यालयामध्ये जावे लागेल.
6- कर्ज परतफेडीचे स्टेटमेंट मागवणे– तुमच्या कर्जाच्या परतफेडची प्रत्येक व्यवहाराची पावती तुमच्या कर्ज खात्यात परावर्तित होईपर्यंत तुम्ही ती तुमच्याकडे ठेवणे गरजेचे आहे. एकदा तुमचे कर्ज संपूर्णपणे बंद झाले की बँकेकडून कर्ज परतफेडीचे संपूर्ण स्टेटमेंट तुम्ही घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये तुमच्या पहिल्या हप्त्यापासून तर शेवटच्या हप्त्यापर्यंतची सगळी डिटेल्स तुम्हाला मिळते.
7- तुमचा क्रेडिट रिपोर्ट अपडेट करावा– बऱ्याचदा असे होते की आपले कर्ज संपूर्णपणे भरले जाते परंतु संबंधित बँक यासंबंधीची माहिती क्रेडिट कंपन्यांना देत नाही व त्यामुळे गृह कर्ज आपल्या क्रेडिट अहवालात ऍक्टिव्ह असल्याचे दिसते. त्यामुळे याचा विपरीत परिणाम तुमच्या सिबिल स्कोर वर होऊ शकतो. त्यामुळे तुमचे कर्ज बंद झाल्यानंतर तुम्ही तुमचा क्रेडिट अहवाल अपडेट करणे गरजेचे आहे.
अशा पद्धतीने तुम्ही तुमचे होम लोन बंद केल्यानंतर वर नमूद केलेली सर्व कामे व्यवस्थित करणे गरजेचे आहे. तसे यासंबंधीचे महत्त्वाच्या कागदपत्रांची हार्ड आणि सॉफ्ट कॉपी दोन्हीही व्यवस्थित सांभाळून ठेवावी.