गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आणि भविष्यकाळातील आर्थिक समृद्धी या अनुषंगाने गुंतवणूक करता यावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक अल्पबचत योजना राबवल्या जातात व या योजनांच्या माध्यमातून सरकार आकर्षक व्याजदराचा लाभ देऊन गुंतवणूकदारांना चांगला परतावा आणि आर्थिक सुरक्षितता प्रदान करते.
केंद्र सरकारच्या या अल्पबचत योजनांमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजना यासारख्या खूप महत्त्वपूर्ण योजना असून सरकारच्या माध्यमातून पीपीएफ योजनेत जमा केलेल्या रकमेवर सध्या 7.1% व्याज दिले जात असून सुकन्या समृद्धी खात्यामध्ये जमा केलेल्या रकमेवर 8.2% इतके व्याज दिले जात आहे.

आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून या योजना महत्त्वाच्या आहेतच परंतु यातील पीपीएफ योजनेत मिळणारा परतावा तसेच मॅच्युरिटीच्या नंतर मिळणारी रक्कम आणि व्याज यावर करात देखील सूट मिळते. अशा प्रकारे या महत्त्वाच्या योजना आहेत.
परंतु आता या 31 मार्च 2024 पर्यंत या योजनांच्या बाबतीत एक महत्वाचे काम करणे आवश्यक आहे. नाहीतर नुकसान होऊ शकते. याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
31 मार्चपर्यंत करा हे काम
मार्च महिना सुरू असून हा आर्थिक वर्ष 2023-24 चा शेवटचा महिना आहे व त्यानंतर नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल. या कालावधीत जर तुम्ही पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते उघडून गुंतवणूक केली असेल
तर तुम्हाला त्या खात्यांमध्ये कमीत कमी रक्कम 31 मार्च पर्यंत जमा करणे गरजेचे आहे. जर तुम्ही ही किमान रक्कम 31 मार्च पर्यंत जमा केली नाहीतर तुमचे खाते बंद होण्याची शक्यता आहे.
यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे अशा प्रकारे जर खाते बंद झाले तर तुम्हाला ते पुन्हा सुरू करता येते. परंतु त्याकरता तुम्हाला काही दंड भरणे गरजेचे असते.
किमान रक्कम भरली नाही तर काय होईल?
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ योजनेमध्ये प्रत्येक वर्षाला कमीत कमी पाचशे रुपये व सुकन्या समृद्धी योजनेमध्ये कमीत कमी 250 रुपये जमा करणे गरजेचे असते.
किमान रक्कम जर तुम्ही जमा केली नाही तर तुमचे खाते बंद केले जाते व ही खाती पुन्हा सुरू करण्याकरिता तुम्हाला पीपीएफ योजनेकरिता पाचशे आणि सुकन्या समृद्धी योजनेकरिता 250 रुपये आणि त्यासोबत पन्नास रुपये डिफॉल्ट फी प्रत्येक वर्षाला जमा करावी लागते.
समजा तुम्ही यामध्ये दोन वर्षांपर्यंत पैसे जमा केले नाही तर तुम्हाला दोन वर्षासाठी शंभर रुपये दंड आणि दोन वर्षाच्या किमान शिल्लक रकमेच्या आधारे पन्नास रुपये दंड भरावा लागू शकतो.
तसेच या योजनांचे खाते जर बंद झाले तर तुम्हाला अडचणीच्या वेळेस अंशीक पैसे देखील काढता येत नाहीत व त्यावर तुम्हाला कर्ज देखील घेता येत नाही. त्यामुळे 31 मार्च पर्यंत तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जर किमान रक्कम भरली नसेल तर ती भरणे गरजेचे आहे.