कोपरगावच्या कलिंगडची पश्चिम बंगालला भरारी! नापीक 30 गुंठे जमिनीतून तंत्रज्ञानाचा वापर करत मिळवला लाखोत नफा

Published on -

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, तंत्रज्ञानाला धरून योग्य व्यवस्थापन, बाजारपेठेचा अभ्यास करून केलेले पिकांचे नियोजन इत्यादी गोष्टी शेतीमध्ये यशासाठी खूप महत्त्वाचे असतात. तसेच सध्या विपरीत हवामानाची परिस्थिती प्रत्येक वर्षी येत असल्याने त्या परिस्थितीनुसार पीक पद्धतीत बदल करणे देखील आता काळाची गरज आहे.

या अनुषंगाने पाहिले तर शेतीमध्ये जे तरुण वळले आहेत ते या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव शेतीत करत असून भरघोस उत्पादन मिळवत कमीत कमी क्षेत्रात देखील योग्य नियोजन करून लाखात नफा मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत.

याच पद्धतीने कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील शंकर निकम या शेतकऱ्याने नापीक 30 गुंठे जमिनीवर योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून 23 टन कलिंगडाचे उत्पादन मिळवले व लाखोत आर्थिक नफा मिळवला आहे.

 कोपरगावचे कलिंगड पश्चिम बंगालच्या बाजारपेठेत

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील शंकर निकम यांनी नापिक जमिनीवर कलिंगड लागवडीचा प्रयोग यशस्वी केला असून योग्य नियोजन करून भरघोस उत्पादन मिळवले आहे.

ह्या जमिनीवर कलिंगडाची लागवड केल्यानंतर औषध फवारणी पासून तर पाण्याच्या नियोजनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कलिंगडाचे उत्पादन त्यांनी घेतले आहे.

या माध्यमातून त्यांना एकूण 23 टन कलिंगडाचे उत्पादन मिळाले व दोन लाख 72 हजार रुपये आर्थिक उत्पन्न मिळवत यातून खर्च वजा जाता त्यांना एक लाख 80 हजार रुपयांचा नफा अवघ्या तीस गुंठात मिळाला आहे.

 शंकर निकम यांनी अशा पद्धतीने केले कलिंगड पिकाचे नियोजन

शंकर निकम यांनी नापीक जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत योग्य नियोजन करून 30 गुंठ्यामध्ये कलिंगड लागवड करण्याचे ठरवले. याकरिता त्यांनी दोन रुपये साठ पैसे याप्रमाणे पाच हजार चारशे रोपांची लागवड तीस गुंठ्यात केली.

पाण्याची उपलब्धता कमी असल्याने ड्रिप चा वापर करून पाण्याचे नियोजन करण्याचे निश्चित केले व कलिंगडाला पाणी व्यवस्थापन केले. ड्रीप मधून विद्राव्य खतांचा आवश्यक तो पुरवठा करण्यावर भर दिला. तसेच पिकाची गरज ओळखून कीटकनाशकांची फवारणी देखील योग्य नियोजनाने केली व दोन महिन्यांनी हे कलिंगड काढणीस तयार झाले.

विशेष म्हणजे शंकर निकम यांच्या शेतात पिकलेल्या एका कलिंगडाचे वजन पाच ते सहा किलो असल्याचे दिसून आले. बाजारपेठेमध्ये कलिंगड विक्रीला पाठवल्यानंतर किलोला साडेबारा रुपये प्रति किलो इतका दर मिळाला व 23 टन कलिंगडातून त्यांना दोन लाख 72 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले

व यातून खर्च वजा जाता एक लाख 80 हजार रुपयांचा निव्वळ नफा हाती मिळाला. तसेच शंकर निकम यांनी पिकवलेले कलिंगड हे दर्जेदार असल्यामुळे पश्चिम बंगालमधील मालदा मार्केटने देखील या कलिंगडाची मागणी केली असून महाराष्ट्राचे हे कलिंगड आता थेट पश्चिम बंगालच्या बाजारपेठेत पोहोचले आहे.

या तरुण शेतकऱ्याला काही प्रयोगशील अशा युवा शेतकऱ्यांची साथ व मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तसेच कलिंगड लागवडीसाठी रोपांकरिता योग्य नर्सरीची निवड करणे देखील गरजेचे असते. तसेच यासोबतच योग्य त्या कंपनीच्या रोपांची लागवड करणे महत्त्वाचे असते. तेव्हाच चांगले उत्पन्न हाती येणे सोपे होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News