कांदा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक असून जवळपास महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर आता होऊ लागलेली आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त प्रमाणामध्ये कांदा लागवड होते व त्याखालोखाल सोलापूर तसेच अहमदनगर व इतर जिल्ह्यांचा नंबर लागतो. कांदा पिकाच्या बाबतीत कायमच ओरड असते की कांद्याचे दर कायम घसरलेले असतात व यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो.
कांदा हा नाशवंत असल्यामुळे त्याला जास्त कालावधी करिता आपल्याला साठवता येत नाही व त्यामुळे आहे त्या बाजारभावात शेतकऱ्यांना कांदा विकावा लागतो. परंतु जर अत्याधुनिक आणि तंत्रज्ञानाने युक्त अशी कांदा चाळ उभारली तर मात्र रब्बी हंगामातील कांदा सहा ते सात महिन्यांपर्यंत उत्तम पद्धतीने टिकवता येणे शक्य होते.
परंतु जर कांदा चाळ उभारण्याचा खर्च पाहिला तर तो जास्त असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला कांदा चाळ बांधता येईल हे शक्य होत नाही. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कांदा चाळ बांधकामासाठी शेतकऱ्याला एक लाख 50 हजार पर्यंत अनुदान देण्यात येते. याच अनुदानासंबंधीची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
काय आहेत कांद्याचा अनुदान योजनेसाठीच्या प्रमुख अटी?
1- याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख अट अशी आहे की, कांदा चाळ बांधकामासाठी जो काही विहीत आराखडा असतो त्याप्रमाणेच बांधकाम करणे बंधनकारक असते.
2- तसेच या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कांदा चाळ ही पाच टन, दहा टन, 15 टन, विस टन, 25 आणि 50 मॅट्रिक टन क्षमतेची असावी व या क्षमतेच्या चाळीला अनुदानाचा लाभ मिळतो.
3- तिसरे महत्त्वाचे म्हणजे कांदा पिकाखालील क्षेत्राची सातबारा उताऱ्यावर नोंद असणे गरजेचे आहे.
4- जेव्हा कांदा चाळीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विहित नमुन्यात त्यासंबंधीचा प्रस्ताव संबंधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दाखल करावा लागतो.
5- या योजनेमध्ये शेतकऱ्याला शंभर मॅट्रिक टन पर्यंत कांदा चाळ बांधता येते व त्यासंबंधीची तरतूद आहे.
कांदा चाळ अनुदानासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांकरिता आवश्यक कागदपत्रे
1- यासाठीचा विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक असतो.
2- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कांदा चाळ अनुदान योजनेकरिता स्वतःच्या मालकीची जमीन अर्जदाराच्या नावे असणे गरजेचे आहे.
3- जर 50 ते 100 मॅट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीसाठी तुम्हाला अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर जमीन एक हेक्टर पेक्षा जास्त असावी.
4- कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी कांदा पिकाची नोंद असणारा सातबारा उताऱ्याची प्रत, आठ अ खाते उतारा अर्जासोबत जोडणे गरजेचे आहे.
5- वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थी देखील या अनुदानाला पात्र राहतात. एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या लाभार्थीच्या बाबतीत मात्र कर्ज मंजुरीच्या आदेशपत्र सहपत्रित करणे आवश्यक असते.
6- कांदा चाळीचा गैरवापर झाला तर लाभार्थी कडून अनुदान दिलेल्या तारखेपासून व्याजासह रक्कम वसूल केले जाऊ शकते.
7- लाभार्थ्यांनी कांदा चाळ बांधणे अगोदर याबाबतचा करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात रुपये विचार स्टॅम्प पेपरवर नोटराईज करून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करणे गरजेचे आहे.
8- तसेच अर्ज करताना केला गेलेला खर्चाची बिले व गोषवारा जोडणे गरजेचे आहे.
9- तसेच कृषी विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला जोडणे देखील गरजेचे आहे.
10- अर्जदाराचा कांदा चाळीचा फोटो अर्जाला जोडावा.
11- कुटुंबातील पती किंवा पत्नी यापैकी एकालाच अनुदानाचा लाभ मिळतो.
कांदाचाळ अनुदान योजनेतून किती मिळते अनुदान?
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 100 मॅट्रिक टन क्षमतेचे कांदा चाळ या माध्यमातून उभारता येते व याकरिता एक लाख 50 हजार पर्यंत अनुदान मिळते.
अधिकच्या माहितीसाठी कुठे कराल संपर्क?
कांदा चाळ अनुदान योजनेचे अधिक माहिती हवी असेल तर पणन मंडळाचे मुख्यालय/ विभागीय कार्यालय/ जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था/ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी संपर्क साधावा.