अहिल्यानगर, 14 जानेवारी 2025 – महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या मुद्द्याला पुन्हा एकदा जोर मिळाला आहे. यावेळी ही मागणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या मातीपूजन कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली.
अहिल्यानगर जिल्ह्याचे दोन मुख्य भाग आहेत – दक्षिण अहिल्यानगर जिल्हा आणि उत्तर अहिल्यानगर जिल्हा. उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात सर्व प्रमुख धरणे आहेत, तसेच शिर्डी आणि शनिशिंगणापूर सारखी दोन मोठी देवस्थाने आहेत. यामुळे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचा विकास अधिक झाला आहे. जिल्ह्यातील एकमेव विमानतळ देखील शिर्डी येथे आहे, जे अर्थातच उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात येत.
राजकीय दृष्टिकोनातूनही उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला नेहमीच झुकतं माप मिळतं. राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात, प्राजक्त तनपुरे, दिवंगत मधुकर पिचड, बाळासाहेब विखे यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी मंत्रिपदे उपभोगली आहेत. मात्र, दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रिपदे कमी काळासाठी मिळाली आहेत. राम शिंदे, बबनराव पाचपुते, अनिल राठोड, शिवाजी कर्डिले यांच्या वाट्याला कमी काळासाठी मंत्रिपदे आली आहेत.
आमदार शिवाजी कर्डिले यांनी शिर्डीप्रमाणे दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातही एखादं मोठं देवस्थान उभारावं लागेल, जेणेकरून आमच्याकडेही मोठे मोठे नेते येतील, असं मत व्यक्त केलं आहे. तर आमदार संग्राम जगताप यांनी देखील जिल्हा विभाजनाची मागणी पुन्हा एकदा केली. जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी जिल्हा विभाजन झालंच पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.
दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातील नेते नेहमीच जिल्हा विभाजनाची मागणी करत असतात, कारण उत्तरेकडे नेहमीच राजकीय समतोल बिघडतो. राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचा राबता उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यात असतो, ज्यामुळे दक्षिणेकडील नेत्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा सुरू असते. नुकत्याच शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन झाले, ज्यामुळे देशभरातील अनेक नेत्यांनी उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचा दौरा केला.
शिर्डीप्रमाणे दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातही विमानतळ व्हावे, अशी मागणी देखील होऊ लागली आहे. विमानतळ झाल्यास सुपा एमआयडीसीत नवनवीन उद्योग येतील, सोबतच दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातील मोहटादेवी देवस्थान, अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेकच्या महागणपती देवस्थान, मेहरबाबा देवस्थानचाही विकास शिर्डीप्रमाणे होईल, असं दक्षिणेकडील नेत्यांना आणि नागरिकांना वाटतंय.