नगर तालुक्यात आमदार लंकेची एंट्री ते माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व ! असे आहेत सर्व निकाल…

Ahmednagarlive24
Published:

Grampanchayat Election Result : नगर तालुक्यातील ८ ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये निबोडी व चारदरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती तर उर्वरीत ६ ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले. सोमवारी (दि.६) लागलेल्या निकालातून तालुक्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. अरणगावमध्ये सत्ता परिवर्तन झाले असून आमदार निलेश लके यांच्या गटाची सत्ता अरणगावमध्ये आली आहे.

तालुक्यात एकूण ८० ग्रामपंचायत सदस्य व आठ सरपंचांसाठी निवडणूक पार पडली होती. हिंगणगाव, हिवरे झरे, मेहेकरी, अरणगाव या चार गावामध्ये सत्ता परिवर्तन झाले असून वडगाव गुप्ता व देऊळगाव सिद्धी येथे सत्ताधाऱ्यांना सत्ता राखण्यात यश आले आहे.

हिंगणगाव, मेहेकरी, बडगाव गुप्ता, देऊळगाव सिद्धी येथे माजी आमदार कर्डिले व विखे गटाचे वर्चस्व दिसून आले तर हिवरे झरे (ठाकरे शिवसेना) व अरणगाव (आ.लके गट ) येथे महाविकास आघाडीला यश आल्याचे दिसून येते. एकंदरीत तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेने खा. सुजय विखे तसेच माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाला कौल दिला असल्याचे दिसून येते.

ग्रामपंचायतच्या निवडणुका सर्वच राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. पार पडलेल्या निवडणुका नगर-पारनेर तसेच नगर-श्रीगोंदा मतदारसंघातील गावामधील होत्या. निबोडी आणि बारवरी येथील निवडणूक बिनविरोध झाल्या असून त्या ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकला असल्याचा दावा कर्डिले समर्थकांनी केला आहे.

हिंगणगाव येथे माजी सरपंच पोपट ढगे यांच्या पत्नी मनीषा ढगे ( मते ८५७ ) विरुद्ध सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष दिलीप सिनारे यांच्या पत्नी हिराबाई सिनारे (मते ८१७) यांच्यात लढत झाली. मनीषा ढंगे या सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. येथे दगे यांचे चार सदस्य तर सिनारे गटाचे पाच सदस्य विजयी झाले आहेत.

देऊळगाव सिद्धी येथे नगर बाजार समितीचे संचालक संजय गिरवले यांच्या पत्नी जयश्री गिरवले (मते. १३३५) विरुद्ध जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष दादाभाऊ चितळकर व बोरकर गटाच्या नूतन बोरकर (मते (१५४५) यांच्यात पारंपारिक लढाई झाली. यामध्ये नूतन बोरकर यांचा सरपंच म्हणून विजय झाला आहे. येथे बोरकर गटाचे आठ सदस्य तर गिरवले गटाचे तीन सदस्य विजयी झाले आहेत.

वडगाव गुप्ता येथे माजी सरपंच विजय शेवाळे यांच्या पत्नी सोनुबाई शेवाळे विरुद्ध माजी सरपंच भानुदास सातपुते गटाच्या ऋतुजा डोगरे यांच्यात लढाई झाली. यामध्ये सोनुबाई शेवाळे यानी सरपंचपदी बाजी मारली आहे. शेवाळे गटाचे १४ सदस्य विजयी झाले. असून अपक्ष उमेदवार दिलीप गव्हाणे हे विजयी झाले आहेत.

मेहकरी येथे माजी सरपंच संतोष पालवे यांच्या पत्ती विद्या पालवे ( मते ५५७) विरुद्ध भाग्यश्री पालवे (मते १२८६) यांच्यात सरळ लढत होती. यामध्ये भाग्यश्री पालवे यांनी विजय मिळविला. येथे यशवंत पालवे गटाचे नऊच्या नऊ सदस्य विजयी झाले आहेत.

हिवरे झरे गावात बाजार समितीचे माजी उपसभापती भाऊसाहेब काळे (मते ७२०) यांच्यासमोर सुदाम रोडे ( मते ५२१) यांनी आव्हान उभे केले होते. येथे भाऊसाहेब काळे हे सरपंच म्हणून निवडून आले तर काळे गटाचे चार सदस्य व रोडे गटाचे पाच सदस्य विजयी झाले आहेत.

अरणगाव येथे सरपंच पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते. येथे पोपट पुंड यांनी सरपंचपदी मोठा विजय संपादन केला आहे. पुंड गटाचे बारा सदस्य निवडून आले आहेत तर बबन शिंदे गटाच्या तीन सदस्यांनी विजय मिळविला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe