Maharashtra BJP Candidate List : लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी आगामी निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. तसेच कोणत्याही क्षणी आचारसंहिताची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे.
राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची नावे फायनल केली आहेत आणि अधिकृत उमेदवारांची लिस्ट देखील समोर येऊ लागली आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टीने आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे.
मात्र, या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव बीजेपीने सार्वजनिक केले नव्हते. यामुळे बीजेपीवर मोठी टिका होऊ लागली होती.
यानिमित्ताने महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत होत्या. आता मात्र महायुतीमधील महाराष्ट्रातील जागा वाटपाचा हा तिढा सुटला असल्याच्या चर्चा आहेत.
काल अर्थातच पाच मार्चला गृहमंत्री अमित शहा यांनी रात्री उशिरा सह्याद्री गेस्ट हाऊसवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या समवेत जागावाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक घेतली.
दरम्यान या बैठकीत महायुतीचा जागा वाटपाचा तिढा आता सुटला असल्याच्या चर्चा सुरू आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा यांच्या समवेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या चर्चाअंती जागा वाटपाचा तिढा आता सुटला आहे.
महायुती मधील कोणत्या पक्षाला किती जागा हे आता ठरल आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, भाजप महाराष्ट्रातील 48 पैकी 32 जागांवर निवडणूक लढवू शकते. उर्वरित जागांपैकी 10 जागा या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला मिळणार आहेत.
तसेच अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला दोन ते तीन जागा दिल्या जाऊ शकतात. अजित दादा यांच्या पक्षाकडून बारामती, रायगड, शिरूर किंवा मावळ या तीन जागेवरून उमेदवार उभे राहणार अशी शक्यता आहे.
विशेष म्हणजे उर्वरित चार जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच उमेदवार उभे राहणार आहेत मात्र हे उमेदवार कमळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबतची अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही.
महायुतीने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अजून जाहीर केलेली नाही. मात्र, आज बीजेपी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून आज राज्यातील उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करणार अशी शक्यता आहे.