MP Nilesh Lanke : स्वराज्याच्या गड किल्ल्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे सहयाद्रीच्या कुशीतील गड, किल्ले तसेच दुर्ग यांच्या संवर्धनाची मोहिम महिन्यातून एका रविवारी करण्याचा संकल्प खासदार नीलेश लंके यांनी वाढदिवसानिमित्त केला. रविवार दि.१६ मार्च रोजी या मोहिमेस शिजन्मभुमी किल्ले शिवनेरी येथून सुरूवात होणार असल्याचे खा. लंके यांनी यावेळी जाहिर केले.
हंगे येथे खा. नीलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. पुरूषांबरोबरच महिलांची गर्दीही यावेळी लक्षणीय होती.

आपल्या संकल्पाविषयी बोलताना खा. लंके यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे, दुर्गांचे जतन, संवर्धन आणि पुनरूज्जीवन करण्याची चळवळ हाती घेण्यात येत आहे. सहयाद्रीच्या कुशीतील किल्ले टिकविणे, ऐतिहासिक संस्कृती, पर्यावरणाची जपवणूक करणे ही काळाची गरज आहे. किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी राजे यांच्या पराक्रमाचे प्रतिक असल्याचे खा. लंके यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे यांचे स्वराज्य हे किल्ल्यांवरच उभे आहे. किल्ले, दुर्गांवरील प्लॅस्टिक, कचरा व पडझड हे किल्ल्याच्या दृष्टीने नव्हे तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महत्वाचा विषय आहे. या गड संवर्धन मोहिमेमध्ये कोणताही राजकिय दृष्टीकोन असणार नाही. महाराजांचे विचार व गड किल्ल्यांची मोहिम भक्कम करण्यासाठी ही मोहिम हाती घेण्यात येणार असल्याचे खा. लंके यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील किल्ले, गड, दुर्ग यांचे जतन, पुनरूज्जीवन, संरक्षण हे फक्त ऐतिहासिक स्मारकाचे रक्षण नसून पर्यावरण, संस्कृती व इतिहासाची जोपासणा करण्याचे एक महत्वाचे कार्य आम्ही हाती घेत असल्याचे लंके म्हणाले.
इतिहासाचे प्रतिक असलेल्या गड, किल्ल्यांचे संवर्धन संस्कृतीचे द्योतक, पर्यावरण रक्षण, पर्यटन आणि रोजगार, गडाचे संवर्धन, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन, संशोधन व प्रबोधन अशा पध्दतीने ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे लंके यांनी सांगितले.
या मोहिमेद्वारे राज्यातील समाजप्रबोधनकार, शिवरायांचे विचार सांगणारे अभ्यासू, पर्यावरण तज्ञ लोकांचा एक स्वतंत्र गट तयार करून गडाचा संरक्षण अहवाल स्थानिक सहभाग, सरकारी योजनांचा निधी, पर्यावरण संरक्षण, गडाचा इतिहास, जुने नकाशे, गडासबंधी माहिती ऑफ लाईन तसेच ऑनलाईन अपलोड करणे हे काम या मोहिमेत करण्यात येणार असल्याचे खा. लंके म्हणाले.
या मोहिमेत स्वयंसेवकाच्या भूमिकेत मी असून सर्वांनी महाराजांचे आपण पाईक म्हणून स्वयंसेवकाच्या भूमिकेत आपण सर्वजण सहभागी होऊ या असे आवाहन खा. नीलेश लंके यांनी केले आहे.
शालेय साहित्याची तुला
खा. लंके यांचे पैठण येथील सहकारी जितूभैय्या परदेशी यांच्या वतीने खा. नीलेश लंके यांची शालेय साहित्याची तुला करण्यात आली. शालेय साहित्यामध्ये वही, पेन तसेच शालेय विद्यार्थ्यांना आवष्यक साहित्याचा समावेश होता.
भजी, जिलेबीचा नास्ता
खा. लंके यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी हंगे येथे जिल्हयासह राज्याच्या विविध भागातून हजारो नागरीकांची सकाळपासूच रिघ लागली होती. खा. लंके यांना कार्यक्रमस्थळी येण्यास उशिर होउनही गर्दीचा ओघ कमी होत नव्हता. आलेल्या पाहुण्यांसाठी गरम भजी आणि जिलेबिच्या नास्त्याची सोय करण्यात आली होती.