Farmer Success Story:- शेतीमध्ये फळबाग लागवडीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उन्नती साधता येते हे अनेक शेतकऱ्यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून आले आहे. तसेच आताची नवीन तरुण पिढी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर येऊ लागली असून अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रात देखील फळबागांच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत असून लाखो रुपये कमवत आहेत.
यामध्ये जर आपण राजस्थान राज्यातील बारमेर जिल्ह्यातील तरुण शेतकरी गणपत चौधरी यांचा विचार केला तर त्यांनी डाळिंब शेतीमध्ये खूप नवीन उंची गाठली असून साधारणपणे 22 बिघे क्षेत्रावर त्यांनी डाळिंबाची लागवड केलेली आहे. यामधून ते लाखोत उत्पन्न मिळवत असून या उत्पन्नाला आधुनिक तंत्रज्ञानाचा खूप मोठा फायदा त्यांना या डाळिंब शेतीमध्ये झाला आहे.

डाळिंब व इतर पिकांच्या लागवडीतून हा तरुण वर्षाला मिळवतो चाळीस लाख रुपयांचा नफा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राजस्थान मधील बारमेर जिल्ह्यातील प्रगतिशील तरुण शेतकरी म्हणून ओळखले जाणारे गणपत चौधरी यांनी त्यांच्या 80 बीघे जमिनीपैकी 22 बिघे जमिनीवर डाळिंबाची लागवड केली आहे व या पिकातून ते वर्षाला चाळीस लाख रुपयांचा नफा कमवत आहेत.
त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले असून त्यांना सैन्यामध्ये भरती व्हायचे होते. परंतु त्यामध्ये अपयश आले व कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने खाजगी नोकरी करणे त्यांना भाग पडले. खाजगी ठिकाणी काम करत असताना मात्र शेतीची आवड मनात कायम राहिली आणि शेवटी नोकरी सोडून 2021 मध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला.
तेव्हा त्यांनी 22 बिघे जमिनीवर पाच हजार डाळिंबाची रोपे लावली. डाळिंब शेतीमध्ये त्यांना अनेक प्रकारच्या समस्या व आव्हानांचा सामना करावा लागला. डाळिंब पिकाचे पोषण व्यवस्थापन तसेच रोग आणि बुरशी इत्यादी समस्या मोठ्या प्रमाणावर आल्या.
परंतु यामध्ये देखील त्यांनी इंटरनेट आणि युट्युब ची मदत घेऊन त्या पद्धतीने व्यवस्थापन केले. शेतीच्या समस्यांवर मात करत असतानाच त्यांनी डाळिंबामधील पोषक घटकांचे व्यवस्थापन कसे करावे हे व्यवस्थित शिकले व त्या पद्धतीने अवलंब केला.
यामध्ये महत्त्वाचे असे आहे की जर शेणखताचा कच्चा स्वरूपामध्ये म्हणजे चांगले कुजलेल्या नसलेला खताचा वापर केला तर बागेमध्ये रोग आणि बुरशीचा धोका वाढू शकतो. त्याकरिता चांगल्या कुजलेल्या शेणखताचा वापर करण्याकरिता त्यांनी इतर शेतकऱ्यांकडून चांगले कुजलेले शेणखत खरेदी करण्यावर भर दिला.
डाळिंबाच्या सुधारित जातीची केली लागवड
गणपत चौधरी यांनी भगवा जातीच्या संकरित डाळिंबाची लागवड केली असून डाळिंबाची ही जात उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असून राजस्थानमध्ये या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते व त्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पादन घेतात. डाळिंब लागवडीकरिता रोपांची निवड करताना खूप काळजी घेतली.
गणपत यांनी याबाबत सांगितले की डाळिंबाची रोपे निवडताना ती निरोगी व रोगमुक्त राहतील अशा पद्धतीने निवडावी. यामध्ये टिशू कल्चर रोपे किंवा गुट्टी कलम केलेली रोपे इत्यादीचा वापर करावा असे ते म्हणतात.
गणपत चौधरी यांनी त्यांच्या शेतामध्ये गुटी कलम केलेल्या रोपांची लागवड केली असून ती महाराष्ट्रातून त्यांनी खरेदी केली आहे. त्यांच्या मते या रोपांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते व त्यांचे आयुष्य देखील जास्त असते व ते जास्त उत्पादन देण्यास सक्षम असतात. गणपत चौधरी यांनी लागवडीसाठी 13 बाय 11 फूट अंतर ठेवले आहे.
जेणेकरून रोपांना वाढायला पुरेशी जागा मिळेल हा त्यामागचा उद्देश आहे. हे अंतर वेगवेगळ्या जमिनीत बदलू शकते. परंतु गणपत चौधरी यांच्या मते हे अंतर रोपांच्या चांगल्या वाढीसाठी उत्तम आहे.
डाळिंब शेतीसाठी येणारा खर्च आणि नफा
गणपत चौधरी यांनी खर्च आणि नफ्याबद्दल सांगितले की, त्यांना पहिल्या वर्षी एक हेक्टर लागवडीकरिता आणि इतर खर्च असा एक लाख 75 हजार ते दोन लाख रुपये खर्च आला. त्यानंतर मात्र कमी खर्च लागतो असे देखील त्यांनी म्हटले. पहिल्या वर्षी झाडांची जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागते व त्यामुळे जास्त खर्च येतो.
त्यांच्या मते एक हेक्टरमध्ये सुमारे 750 रोपांची लागवड करता येते. आज डाळिंब आणि इतर पिकांच्या माध्यमातून गणपत चौधरी वर्षाला 40 लाख रुपयांचा नफा मिळवत आहे. या नफ्यामध्ये जिरे, एरंडी तसेच जुन्या व नवीन फळबागांच्या उत्पन्नाचा देखील समावेश आहे.