Marigold Cultivation:- परंपरागत पिकांच्या लागवडीला फाटा देत आताचे शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आणि फळपिके व त्यासोबतच फुल पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करू लागले असून त्या माध्यमातून लाखोत उत्पन्न मिळवत आहेत. तसेच या सगळ्या पिकांच्या लागवडीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अचूक व्यवस्थापन खूप महत्वाचे ठरताना आपल्याला दिसून येत आहे.
फुल पिकांच्या दृष्टिकोनातून बघितले तर शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून आता शेतकरी अनेक प्रकारच्या फुलांचे भरघोस उत्पादन मिळवताना दिसून येत आहेत. यातील जर आपण झेंडू या फुलाची लागवड आणि उत्पादन बघितले तर दसरा आणि दिवाळीच्या कालावधीमध्ये प्रचंड प्रमाणात झेंडूच्या फुलांना मागणी असते व त्यासोबत इतर कालावधीमध्ये देखील झेंडूच्या फुलांना आता मागणी असल्याचे आपल्याला दिसून येते.

त्यामुळे कमी खर्चात झेंडू फुलांच्या लागवडीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवता येणे शक्य असल्याने अनेक शेतकरी आता झेंडू लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळल्याचे आपल्याला दिसून येते. अगदी या अनुषंगाने आपण बारामती तालुक्यातील नींबूत या गावच्या रियाज भाई सय्यद या शेतकऱ्याची यशोगाथा बघितली तर इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी अशी आहे.
रियाज भाई सय्यद यांनी झेंडू फुलाच्या विक्रीतून मिळवले बारा लाखाचे उत्पन्न
बारामती तालुक्यातील नींबूत या गावचे प्रयोगशील शेतकरी रियाज भाई सय्यद यांनी दोन एकर शेतामध्ये झेंडू लागवड केलेली होती व त्या झेंडू फुलांच्या विक्रीतून त्यांना 12 लाख रुपये आर्थिक उत्पन्न मिळाले आहे.
बाजारपेठेचा अभ्यास करून जर पीक नियोजन केले तर शेतकरी लाखोत उत्पन्न मिळवू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे रियाज भाई सय्यद यांच्या उदाहरणावरून आपल्याला दिसून येते.
रियाज सय्यद हे प्रयोगशील शेतकरी असल्याने टोमॅटो तसेच ऊस पिकाच्या माध्यमातून देखील त्यांनी भरघोस उत्पादन मिळवले असून चांगले आर्थिक उत्पन्न प्राप्त केलेले आहे. परंतु यावर्षी त्यांनी ऊस पिकाला फाटा देत दिवाळी आणि दसऱ्याचा मुहूर्त साधून त्या दृष्टिकोनातून दोन एकरमध्ये झेंडू फुलांची लागवड केली.
झेंडूचे उत्पादन हे लागवडीनंतर साधारणपणे 65 ते 70 दिवसात चालू होते. कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन देणारे पीक म्हणून झेंडू फुलपिक ओळखले जाते. दोन एकर झेंडू लागवड करण्याचे ठरवल्यानंतर त्यांनी अगोदर नांगरणी करून प्रति एकरी दोन ट्रॉली शेणखत टाकले व चार फुटी सरी काढून मल्चिंग पेपर अंथरून त्यावर ड्रिप इरिगेशन केले व नंतर झेंडू फुलांची लागवड केली.
कसा मिळाला झेंडूच्या फुलांना बाजार भाव?
झेंडू लागवड केल्यानंतर तण नियंत्रणासाठी निंदणी व किरकोळ औषध फवारणी केली.दोन एकर क्षेत्रातून जवळपास 12 टन झेंडूची काढणी करण्यात आली. हा 12 टन झेंडू त्यांनी निरा तसेच वाई, पुणे आणि मुंबईच्या बाजारपेठेमध्ये पाठवला व साधारणपणे नऊ ते दहा हजार रुपये टनाच्या आसपास त्याची विक्री केली.
या विक्रीतून त्यांना जवळपास 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. इतकेच नाही तर अजून देखील या झेंडू पिकातून पाच ते सहा टन फुलांचे उत्पादन मिळण्याची अपेक्षा त्यांना असून त्यातून आणखी लाखोत उत्पन्न मिळण्याचा अंदाज त्यांना आहे.
अशाप्रकारे जर मार्केटचे योग्य नियोजन आणि टाइमिंग साधून जर पिकांची लागवड केली तर नक्कीच यातून चांगल्या प्रकारे पैसा शेतकऱ्यांना मिळू शकतो हे रियाज भाई सय्यद यांच्या उदाहरणावरून सिद्ध होते.