Dragon Fruit Farming:- शेती असो की कुठलीही क्षेत्र असो यामध्ये कष्टाला पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय कुठल्याही गोष्टीत यश आपल्याला मिळत नाही व या कष्टा सोबतच योग्य नियोजन तसेच केलेल्या प्लॅनिंग तडीस नेण्यासाठी करावी लागणारी मेहनत,जिद्द इत्यादी गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.
शेतीच्या अनुषंगाने बघितले तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सोबतीला अचूक आणि योग्य कालावधीत केलेले व्यवस्थापन शेतकऱ्यांना आता कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून देत आहे. सध्या आधुनिक स्वरूपात शेती केली जाते व या आधुनिक स्वरूपामध्ये परंपरागत पिकांना तिलांजली देत शेतकरी प्रामुख्याने फळबागा लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहे.

त्यातल्या त्यात पारंपारिक फळ पिकांसोबतच ड्रॅगन फ्रुट सारख्या विदेशी फळाची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर करत असून लाखो रुपयांचे उत्पन्न अगदी कमी क्षेत्रामध्ये देखील शेतकरी मिळवत आहेत. असाच काहीसा ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात असलेल्या पिंपळगाव येथील प्रयोगशील शेतकरी बाजीराव पांडुरंग दातखिळे यांनी केला व तो यशस्वी करून उत्पादन देखील मिळवले.
एका एकरात घेतले ड्रॅगन फ्रुटचे भरघोस उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात असलेल्या पिंपळगाव या गावचे प्रयोगशील शेतकरी बाजीराव पांडुरंग दातखिळे यांनी ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचे ठरवले व त्याकरिता इतर शेतकरी तसेच परराज्यातील शेतकऱ्यांकडे जाऊन संपूर्ण माहिती घेतली व नंतर ड्रॅगन फ्रुट लागवड करण्याचे ठरवले.
यामध्ये त्यांनी एका एकरात ड्रॅगन फ्रुट लागवड केली.तसे पाहायला गेले तर भूम तालुका हा परिसर दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो व त्या ठिकाणी ड्रॅगन फ्रुट शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. कमीत कमी पाण्यामध्ये येणारे हे पिक असल्यामुळे बाजीराव दातखिळे यांना याचा खूप मोठा फायदा झाला.
त्यांनी ड्रॅगन फ्रुटची सी व्हरायटी शेतीचा प्रयोग यशस्वी केला असून सध्या त्यांच्या या ड्रॅगन फ्रुट फळ पिकाला भरभरून अशी फळे लगडली आहेत व यावर्षी ड्रॅगन फ्रुटला बाजार भाव देखील चांगला मिळत आहे.दोन वर्षांमध्ये त्यांना एका एकरमध्ये साधारणपणे एक ते दीड लाख खर्च आला असून त्यातून 10 ते 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल असा अंदाज त्यांना आहे.
विदेशात पिकणारे हे फळ आता मराठवाड्यासारख्या कमी पाणी असलेल्या जमिनीत देखील यशस्वीपणे घेण्यात शेतकऱ्यांनी यश मिळवले आहे.साधारणपणे धाराशिव जिल्ह्यामध्ये आता अनेक शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांसोबतच ड्रॅगन फ्रुट्र लागवड सुरू केली असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीमध्ये नक्कीच भर पडेल.
मार्केटमध्ये मिळत आहे सरासरी शंभर रुपये किलोचा भाव
यावर्षी ड्रॅगन फ्रुटला बाजारपेठेत सरासरी शंभर रुपयांचा दर मिळत असून या हंगामात 10 ते 12 टन उत्पन्न बाजीराव दातखिळे यांना मिळेल असे त्यांना अपेक्षा आहे. या बाजारा भावानुसार दहा ते बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे.
सध्या त्यांच्या या ड्रॅगन फ्रुट शेतीची चर्चा पंचक्रोशीत असल्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या या शेतीला भेट देत आहेत. विशेष म्हणजे बाजीराव दातखिळे यांचा या प्रयोगामुळे तरुण शेतकऱ्यांना देखील चांगली प्रेरणा मिळण्यास मदत झालेली आहे.