पारनेर तहसील कार्यालयाचा कारनामा, चक्क मयत व्यक्तीच्या नावावर जारी केले नवीन रेशन कार्ड, पण…

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तहसील कार्यालयातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पारनेर तहसील कार्यालयाने चक्क मयत व्यक्तीच्या नावावर नवीन रेशन कार्ड जारी केले असल्याचे वृत्त समोर आले आहे. यामुळे पुन्हा एकदा पारनेर तहसील कार्यालयात सुरू असलेल्या सावळा गोंधळ ऐरणीवर आला आहे.

यामुळे तहसील कार्यालयात सुरू असलेला हलगर्जीपणा उजागर झाला असून यामुळे तहसील कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शासन आपल्या दारी या शासनाच्या महत्त्वकांक्षी उपक्रमांतर्गत पारनेर तालुक्यात सर्वसामान्यांना लागणारी विविध कागदपत्रे उपलब्ध व्हावीत यासाठी महसूल विभागाकडून गावोगावी शिबिरे आयोजित करण्यात आली होती.

या शिबिरांना सर्वसामान्यांनी चांगला उदंड प्रतिसाद दिला. महसूल विभागाच्या या शिबिरांच्या माध्यमातून तरी आपल्याला लवकरात लवकर आवश्यक असणारी कागदपत्रे मिळतील अशी भोळी भाबडी आशा तालुक्यातील जनतेला होती.

दरम्यान या शिबिरांमध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच इतर अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी नागरिकांनी अर्ज केले होते. पण सर्वात जास्त अर्ज नवीन रेशन कार्डसाठी सादर झालेत.

मात्र या सादर झालेल्या अर्जांपैकी अनेकांना अजूनही रेशन कार्ड मिळालेले नाही. परंतु एका मयत व्यक्तीच्या नावाने त्यांच्या कुटुंबीयांना नवीन शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यामुळे सदर मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांना नाहक अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे ज्या मयत व्यक्तीच्या नावावर ही शिधापत्रिका देण्यात आली आहे त्यांचा मृत्यू 2022 मध्येच झाला आहे. मात्र कुटुंबाला दिल्या गेलेल्या रेशन कार्डवर 2023 या वर्षाचा उल्लेख आहे.

अर्थातच रेशन कार्ड देताना कागदपत्रांची पडताळणी झालेली नाही. विशेष बाब अशी की, मयत व्यक्तीच्या नावाने जारी झालेल्या शिधापत्रिकेवर तहसीलदार महोदय यांची सही देखील आहे. यामुळे पारनेर तहसील कार्यालयाचा हा प्रताप विविध प्रश्न उपस्थित करत आहे.

कागदपत्रांची कोणतीही पडताळणी न करता तहसील कार्यालयाने मयत व्यक्तीच्या नावाने नवीन रेशन कार्ड तयार केलेच कसे? हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे तहसीलदार महोदय यांच्या आणि तहसील कार्यालयाच्या या कारनाम्यामुळे सदर मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.

या मयत कुटुंबातील सदस्यांनी सदर मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला देखील पुरवठा विभागाकडे सादर केलेला होता. तरीही मयत व्यक्तीच्या नावानेच नवीन शिधापत्रिका बनवली गेली. दुसरीकडे रेशन कार्डसाठी अर्ज केलेल्या अनेकांना अजूनही रेशन कार्ड मिळत नाहीये.

त्यामुळे पारनेर तहसील कार्यालयाच्या कामकाजावर नागरिकांच्या माध्यमातून मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यातील जवळपास 700 ते 800 कुटुंब नवीन शिधापत्रिका मिळावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत आहेत. यासाठी सर्वसामान्यांना तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe