Supriya Sule News : सध्या अहमदनगर, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वंचितने पुणे जिल्ह्यातील एका जागेवरून आपला उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरेतर वंचित बहुजन आघाडीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या काही उमेदवारांची उमेदवारी रद्द करत त्या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली.
मराठवाड्यातील परभणी लोकसभा मतदारसंघात देखील वंचितने आधी जाहीर केलेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करत त्या ठिकाणी जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना संधी दिली. अशातच आता वंचितने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे बारामतीचे अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांचा विरोध केल्यामुळे चक्क आपल्या उमेदवाराचीच उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
वंचित बहुजन आघाडीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सुकन्या खासदार रत्न सुप्रिया सुळे यांच्या जागेवर उमेदवार न उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे. वंचितने या जागेवर सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिलेला आहे. तथापि पक्षाच्या या निर्णयाचे वंचितने शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेल्या मंगलदास बांदल यांनी अवहेलना केली.
पक्षाने बारामती बाबत जो निर्णय घेतला होता त्या विरोधात बांदल यांनी भूमिका घेतली. यामुळे वंचित बहुजन आघाडीने शिरूर लोकसभा मतदारसंघातून मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता शिरूर च्या जागेवर वंचित दुसरा उमेदवार देणार आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर आणि प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई झालेली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, मंगलदास बांदल यांनी काल अर्थातच 5 एप्रिल 2024 ला इंदापूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
ही भेट सुळे यांच्या विरोधासाठी असल्याचे म्हटले जात होते. याबाबत वंचितने आता गंभीर दखल घेतली असून बांदल यांची शिरूर येथील उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. यामुळे आता शिरूर लोकसभा मतदारसंघात वंचित कोणता नवीन उमेदवार उतरवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
एकंदरीत, बारामतीमधून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांचा विरोध आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वंचितच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या अंगलट आली असून त्यांची शिरूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतलेला आहे.