Ahmednagar Politics : अहमदनगर सहित संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळी पाहायला मिळत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर संपूर्ण राज्यात राजकीय वातावरण तापलेले आहे. राजकीय पक्षांनी महाराष्ट्रातील अनेक जागांवर आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर केलेली आहेत. काही जागांवर अजून अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे. मात्र लवकरच राजकीय पक्ष सर्व जागांवर आपल्या अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार आहेत.
नगर दक्षिण बाबत बोलायचं झालं तर येथे महायुतीने आणि महाविकास आघाडीने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केलेली आहे. यंदाच्या निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाने पुन्हा एकदा सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे.
दुसरीकडे या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खरे तर निलेश लंके हे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजितदादा यांच्या गटात गेले होते. मात्र निवडणूक लढवण्याच्या महत्त्वाकांक्षी पोटी त्यांनी पुन्हा एकदा मोठ्या साहेबांकडे धाव घेतली आहे अर्थात शरद पवार यांच्या गटात प्रवेश घेतला आहे.
दरम्यान शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्यानंतर निलेश लंके यांना शरद पवार गटाने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी बहाल केली आहे. अर्थातच यंदाची निवडणूक सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी होणार आहे. परंतु प्रत्यक्षात ही निवडणूक शरद पवार विरुद्ध विखे पाटील अशी राहणार आहे. शरद पवार विरुद्ध विखे पाटील घराणे यांच्यातील हे राजकीय वैर जवळपास 4 दशकांपासून म्हणजे 40 वर्षांपासून सुरू आहे.
त्यामुळे यंदाची ही निवडणूक गेल्या निवडणुकीप्रमाणेच काटेदार होणार आहे. शरद पवार आणि विखे पाटील घराण्यातला हा वाद विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांच्या काळापासून सुरू आहे. दरम्यान आज आपण विखे पाटील आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संघर्ष कधीपासून सुरु आहे, या संघर्षाला कशी सुरुवात झाली हे समजून घेणार आहोत.
कधी सुरू झाला शरद पवार आणि विखे पाटील यांचा संघर्ष
40 वर्षांपूर्वी अर्थातच 1991 मध्ये शरद पवार आणि विखे पाटील घराणे यांच्यातील संघर्षाला सुरुवात झाली. घडलं अस की, 1991 मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने बाळासाहेब विखे पाटील यांना उमेदवारी नाकारत यशवंतराव गडाख यांना संधी दिली. त्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांनी यावर नाराजी व्यक्त करत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. यावेळी काँग्रेसच्या उमेदवाराला अर्थातच गडाख यांना शरद पवार यांनी पाठबळ दिले.
शरद पवार यांच्यामुळे गडाख यांना विजय मिळाला. मात्र निवडणुकीनंतर बाळासाहेब विखे पाटील निकालावर नाराज होते. हा पराभव त्यांच्या खूपच जिव्हारी लागला. यामुळे त्यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी निवडणूक प्रचारात केलेल्या पवार यांच्या भाषणावर दिवंगत बाळासाहेब पाटील यांनी आक्षेप घेतला होता. या प्रकरणात माननीय न्यायालयाने बाळासाहेब विखे पाटील यांच्या बाजूने निकाल दिला.
त्यावेळी माननीय न्यायालयाने गडाख यांना पुढील सहा वर्षांच्या काळासाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घातली. मात्र या प्रकरणातून शरद पवार यांची काही काळाने सुटका झाली. परंतु विखे आणि शरद पवार यांच्यातील हा वाद तेव्हापासून सुरुच आहे. यामुळे तेव्हापासून नगरच्या राजकारणात शरद पवार हे नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. विखे यांना शह देण्यासाठी वेळोवेळी त्यांनी प्रयत्न केले असल्याचे दिसते. यंदाच्या निवडणुकीत देखील निलेश लंके यांना रिंगणात उतरवून त्यांनी विखे यांना शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दरम्यान, सुजय विखे पाटील यांनी नुकतेच हा संघर्ष 40 वर्षांपासून सुरू असून समोरून कुणी उमेदवार नसला तरी विखे कुटुंबाविरोधात एखादा उमेदवार उभा करणे, ताकद देणे आणि षड्यंत्र करून विखेंचा पराभव कसा करता येईल ? याचा प्रयत्न पवारांकडून केला जात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याबाबत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याची विखे पाटील यांना भीती वाटत असावी यामुळेच त्यांनी विखे विरुद्ध पवार असे चित्र रंगवायला सुरुवात केली असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी अहमदनगर जिल्ह्याचे सर्वात जास्त नुकसान केले असेल तर ते शरद पवारांनी केले आहे, असे म्हटले. तसेच जिल्ह्यात भांडणे लावायची, जिल्ह्यातील असंतुष्ट लोकांची मोट बांधायची आणि आमच्या विरुद्ध शिमगा करायला लावायचा असा त्यांचा प्लॅन असल्याचे विधान केले आहे.