हौसेला मोल नाही ! अहमदनगर जिल्ह्यात गाईच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात पडला पार, अख्ख्या महाराष्ट्रात रंगल्या चर्चा

Ajay Patil
Published:

Ahmednagar News : शेती व्यवसायात आणि हिंदू धर्मात गाईला मोलाचे असे स्थान लाभले आहे. सनातन हिंदू धर्मात गाईला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे आपल्या हातून गोसेवा व्हावी या अनुषंगाने शतकरी बांधव आपल्या दावणीला गाय कायमच ठेवतात.

शेतकरी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे गाईची तसेच दावणीला असलेल्या इतर जनावरांची काळजी घेत असतात. शेतकरी आणि त्याच्या दावणीला असलेल्या जनावरांचे प्रेम नेहमीच पाहायला मिळते. दरम्यान आता अहमदनगर जिल्ह्यातही असंच एक उदाहरण पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या आंबी खालसा येथील एका शेतकऱ्याने आपल्या गाईचा चक्क डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला आहे. यामुळे सध्या या शेतकरी कुटुंबाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. खरं पाहता, गाईच्या दुधापासून अन शेणापासून शेतकऱ्यांनां चांगले उत्पन्न मिळत असते. गाय पालनातून शेतकऱ्यांना लाखोंचे उत्पन्न मिळतं, शिवाय गौपूजनला हिंदू धर्मात मोठं महत्व प्राप्त आहे.

हेच कारण आहे की, अलीकडे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात गाईचे संगोपन करू लागले आहेत. आंबी खालसामधील जोठेवाडी येथील बाळासाहेब लक्ष्मण गाडेकर हे देखील गाईचे संवर्धन करतात. गाईचे संवर्धन फक्त फायद्यासाठी गाडेकर करत नसून आपल्या हातून गोसेवा व्हावी हा त्यामागचा हेतू आहे. दरम्यान आता गायीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी गाडेकर यांनी त्यांच्या गाईचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम केला आहे.

या गाडेकर कुटुंबाने गायीचे डोहाळे जेवण घालून इतरांपुढे गायीच्या महतीचं पठनचं केलं आहे. खरं पाहता, शेतकऱ्यांसाठी आपल्या दावणीला बांधलेले जनावर कुटुंबातील सदस्याप्रमाणेच असतात. यामुळे गाडेकर कुटुंबांनी  डोहाळे जेवण सोहळा प्रसंगी गोमातेचे पूजन, कीर्तन, महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन देखील केले होते.

या कार्यक्रमाला गावातील अनेक शेतकरी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर देखील उपस्थित होते. निश्चितच एखाद्या शाही सोहळ्या प्रमाणे गायीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम गाडेकर यांनी करून इतर शेतकऱ्यांच्या पुढ्यात एक आदर्श रोवला आहे.

या सोहळ्याला आलेल्या अनेक शेतकऱ्यांनी देखील गाईचा योग्य पद्धतीने सांभाळ करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. तसेच निदान एक गाय तरी शेतकऱ्यांच्या दावणीला असली पाहिजे असे देखील यावेळी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe