विधानसभेचा बिगुल वाजलाय. डॅमेज स्विकारुन महायुती कात टाकणारेय. भाजपने दोन दिवसांपूर्वी आपल्या नेत्यांची बैठक घेतलीय. शिंदे गटानेही विधानसभेबाबत कार्यकर्त्यांना सुचना केल्या. आता अजित दादांची राष्ट्रवादीनेही चाचपणी सुरु केलीय. महायुतीत हे तिन्ही पक्ष एकत्र राहतील का, हा खरा प्रश्न आहे. छगन भुजबळांनी तर थेट ८०-९० जागांची मागणी केलीय. शिवसेनाही तेवढ्याच जागा मागेल. या दोघांच्या अपेक्षा पूर्ण केल्यानंतर भाजपच्या वाट्याला किती जागा येतील व त्यानंतर महायुती टिकेल का, हाच खरा चर्चेचा विषय आहे.
मंगळवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अहमदनगर दौरा केला. येथील बाराही विधानसभांचा आढावा घेतला. काही दिवसांनी स्वतः अजितदादाही नगर भेटीला येतील. याचाच अर्थ अवास्तव जागा मागणीमुळे महायुती टिकण्याच्या शक्यता कमी दिसताहेत. अजितदादा गटानेही सेकंड ऑप्शन म्हणून स्वबळाची मानसिकता केलेली दिसते. अजितदादा गट विधानसभा स्वतंत्र लढला तर नगर जिल्ह्यात त्यांचे कोण-कोण उमेदवार असतील, याच विषयाचा अहमदनगर लाईव्ह २४ ने घेतलेला हा आढावा…
आता नगर जिल्ह्याचा विचार केला, तर गेल्यावेळी राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले होते. त्यापैकी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार व राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे व पारनेरचे माजी आमदार निलेश लंके हे शरद पवारांसोबत राहिले. तर कोपरगावचे आशुतोष काळे, अकोल्याचे किरण लहामटे, नगर शहराचे संग्राम जगताप हे आमदार अजितदादांसोबत आले. यावेळी राष्ट्रवादीला स्वबळावर लढायचे असेल तर, नगर जिल्ह्यात या तिघांचे तिकीट कायम ठेऊन, नवीन नऊ भिडू शोधावे लागणार आहेत. आता ते नवे नऊ भिडू कोणते याचा अंदाज पाहू…
१,२ संगमनेर- राहाता
संगमनेरमध्ये ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व राहात्यात मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात तगडा उमेदवार कुणालाच मिळत नाही, असा इतिहास आहे. राष्ट्रवादीलाही या दोन तालुक्यात सक्षम उमेदवार मिळेलच, याची शाश्वती नाही.
३. राहुरी
शेजारच्या राहुरी तालुक्यात प्राजक्त तनपुरेंना पराभव करायचा असेल तरीही तिच स्थिती आहे. कारण तेथील पराभूत आमदार शिवाजी कर्डिले हे सध्या भाजपमध्ये आहेत. अजितदादांना तनपुरेंवरचा रागाच काढायचा, तर कर्डिलेंना आपल्याकडे घ्यावे लागेल. मध्यंतरी कर्डिलेंनीही अजितदादांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. ती भेट कदाचित याच शक्यतांची असावी, असा अंदाज आहे.
४. नेवासा
नेवाशाचा विचार केला तर शंकरराव गडाखांचा पराभव करण्यासाठी अजितदादांना तेवढाच तगडा उमेदवार शोधावा लागेल. येथे माजी खासदार दिवंगत तुकाराम गडाख यांचे बंधू किसनराव गडाखांना राष्ट्रवादीत घेण्याचा डाव अजितदादा टाकू शकतात. असे झाले तर ही लढत रंगतदार होईल.
५. शेवगाव-पाथर्डी
शेवगाव-पाथर्डीत मोनिका राजळेंना पराभूत करायचे तर अजितदादांकडे माजी आमदार चंद्रशेखर घुलेंचा पर्याय आहे. त्यांनाच तेथून तिकीट मिळण्याची शक्यताही आहे.
६. श्रीरामपूर
श्रीरामपूरमध्ये लहू कानडेंविरोधात अजितदादा भाऊसाहेब कांबळेंना आपल्याकडे घेऊ शकतात. कारण कांबळेंनी आत्तापर्यंत अनेकदा पक्षबदल केला आहे. आता आमदारकी लढवायची, तर तेथे भाजपच्या नितीन दिनकरांचे पारडे यावेळी जड आहे. दिनकरांना भाजपने तिकीट दिले, तर कांबळेंना आमदार होण्यासाठी अजितदादांचाच पर्याय उरतो.
७. श्रीगोंदा
श्रीगोंद्यात बबनराव पाचपुतेंविरोधात अजितदादांकडे अनुराधा नागवडेंच्या रुपाने आधीपासूनच उमेदवार आहे. पक्षात घेतानाच अजितदादांनी त्यांना आमदारकीचा शब्द दिल्याचेही बोलले जाते.
८. कर्जत-जामखेड
कर्जत-जामखेडमध्ये अजितदादा रोहित पवारांना पराभूत करण्यासाठी सगळे डाव टाकतील. गेल्या काही दिवसांत अजितदादांनी तेथे चांगली ताकदही जमविली आहे. बारामतीत शरद पवार अजितदादांविरोधात त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार उभा करण्याच्या चर्चा आहेत. असे झाले तर कदाचित, रोहितदादांचा बदला घेण्यासठी अजितदादा आपला मुलगा पार्थ पवारांना कर्जत-जामखेडमध्ये उभे करतील.
९. पारनेर
पारनेरमध्ये निलेश लंकेंवरचा राग काढण्यासाठी अजितदादा दोन्ही विजय औटींपैकी कुणाला तरी नक्की गळाला लावतील. परिस्थितीही तशीच राहिल कारण भाजपने विजय सदाशिव औटींना तिकीट दिले तर ज्येष्ठ नेते विजयराव भास्करराव औटी नाराज होतील. मग अजितदादा त्यांनाच गळाला लावून राणी लंकेविरोधात डाव खेळतील.