Farmer Success Story :- शेडनेट तंत्रज्ञान हे एक महत्वपूर्ण तंत्रज्ञान असून कमीत कमी क्षेत्रामध्ये तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर भरघोस उत्पादन या माध्यमातून घेऊ शकतात. महाराष्ट्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर शेडनेटच्या माध्यमातून भाजीपाला,
फुल पिकांची लागवड केली जात असून शेतकरी मोठ्या प्रमाणावर या माध्यमातून आर्थिक नफा मिळवताना दिसून येत आहे. कारण आता तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकरी कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील भरघोस उत्पादन मिळवू लागले आहेत.
जर आपण आताच्या तरुण शेतकऱ्यांचा विचार केला तर तरुण शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर शेतीत करत असून शेती पूरक जोडधंद्यांमध्ये देखील तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे तरुण शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रगतीच्या दिशेने झेप घेतल्याचे सध्या चित्र आहे.
याचा अनुषंगाने जर आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील अजित खांडगौरे यांचे उदाहरण पाहिले तर यांनी शेडनेटच्या माध्यमातून सिमला मिरचीची लागवड केली व त्या मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्यात यश मिळवले आहे. याच संबंधीची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
अजित खांडगौरे यांचा शिमला मिरचीचा प्रयोग
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथील अजित चंद्रशेखर खांडगौरे यांची त्यांच्या गावाच्या बाजूला मुरमाड तीन एकर शेती असून इतर शेतकऱ्यांप्रमाणेच ते कपाशी तसेच ज्वारी व मक्यासारखे पारंपारिक पिकांचे उत्पादन त्या ठिकाणी घेत होते.
अजित हे उच्चशिक्षित असून स्पर्धा परीक्षेत प्रयत्न केल्याने देखील यश मिळाल्यामुळे त्यांनी शेती करण्याचे निश्चित केले. परंतु शेती करताना तिला तंत्रज्ञानाची जोड द्यावी या उद्देशाने त्यांनी 2022 मध्ये एक एकर क्षेत्रावर शेडनेटची उभारणी केली. शेडनेट उभारल्यानंतर त्यांनी त्यामध्ये लाल,
पिवळ्या रंगाच्या शिमला मिरचीचे पहिल्यांदा उत्पादन घेतले. परंतु बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव व बाजारभाव कमी मिळाल्याने त्यांचा फक्त उत्पादन खर्च या माध्यमातून निघाला. परंतु यामध्ये अपयश आल्यानंतर निराश न होता त्यांनी या अपयशातून बऱ्याच गोष्टी शिकल्या व त्यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून शेती क्षेत्रातील तज्ञांशी संपर्क करत शेडनेट मधील शिमला मिरचीची लागवड व तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेऊन यामध्ये यशस्वी वाटचाल सुरू केली.
आता त्यांना चांगल्या प्रकारे शिमला मिरचीचे उत्पादन मिळत असून ते नाशिक व पनवेल या ठिकाणी तिची विक्री करत आहेत. तसेच स्थानिक व्यापारी जागेवर येऊन शिमला मिरचीची खरेदी करत असल्याने एका अर्थाने त्यांनी आता ही शिमला मिरचीची शेती यशस्वी करून दाखवली आहे.
2022 मध्ये एक शेडनेट उभारले आणि त्यानंतर अजून एक एकर क्षेत्रावर दुसरे शेडनेट उभारले आहे. दुसऱ्या शेडनेटमध्ये त्यांनी मल्चिंग पेपरचा वापर करत काकडीची लागवड करण्याची सध्या तयारी सुरू केली आहे.
अजित यांचे शिमला मिरचीच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांचे गणित
शिमला मिरचीची जेव्हा लागवड केली जाते त्यानंतर 45 दिवसांपासून दर आठ दिवसांनी तिची तोडणी केली जाते. एका तोड्यातून त्यांना दोन ते तीन टन उत्पादन मिळते. सध्या 40 ते 45 रुपये प्रतिकिलोचा बाजार भाव शिमला मिरचीला मिळत असून
गेल्या वर्षी त्यांनी 90 ते 95 रुपये दराने विक्री केली होती. सरासरी प्रति किलो 15 रुपयांचा खर्च पकडला तरी वार्षिक खर्च वजा जाता त्यांना तीन ते पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न शिमला मिरचीतुन मिळत आहे.