शेतकरी मोठ्या कष्टाने आणि राबराब राबून, कितीही नैसर्गिक आपत्ती आल्या तर त्यांना पर्वतासमान तोंड देऊन सोन्यासारखा शेतमाल पिकवतात. परंतु हातात आलेला हा शेतमाल जेव्हा विक्रीसाठी बाजारात नेतात तेव्हा त्याला कवडीमोल दराने विकत घेतले जाते. एवढेच नाही तर कधीकधी एवढ्या कष्टाने, रक्ताचे पाणी करून पिकवलेल्या शेतमाल रस्त्यावर फेकून द्यायची वेळ शेतकरी बंधूंवर येते.
अशाप्रकारे शेतकरी बंधू उपाशी तर व्यापारी तुपाशी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी पिकवलेला शेतमाल व्यवस्थित नियोजन आणि विक्री कौशल्याने स्वतः विकला तर त्याला नक्कीच दोन पैसे हातात राहतील आणि नफा देखील चांगला मिळेल. स्वतः पिकवलेल्या शेतमालावर दुसऱ्याचा फायदा करण्यापेक्षा स्वतः राबवून विक्री केल्याने नक्की शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल यात शंकाच नाही.
नेमकी हीच बाब लक्षात घेऊन सासवड येथील काही शेतकरी कुटुंबातील तरुणांनी एकत्र येत पिकवलेले सिताफळ आणि अंजीर स्वतः विक्री करून रोज 30 ते 40 लाखांची उलाढाल त्या माध्यमातून करीत आहेत. याचा दुहेरी फायदा होताना दिसून येत आहे. म्हणजे या व्यापाऱ्यातून शेतकरी पुत्रांना तर लाभ होतच आहे परंतु शेतकऱ्यांना देखील त्यांनी पिकवलेल्या सिताफळ व अंजिराला चांगला भाव मिळत असल्याने त्यांच्यामध्ये देखील समाधानाचे वातावरण आहे.
जर आपण सासवड तालुक्याचा विचार केला तर या ठिकाणी सीताफळ आणि अंजिराची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. जर लागवड क्षेत्राचा विचार केला तर जवळजवळ साडेपाच ते सहा हजार हेक्टर क्षेत्र या फळांच्या लागवडीखाली आहे. यामध्ये सीताफळाचे उत्पादन जून पासून सुरू होऊन डिसेंबर पर्यंत ते सुरू राहते तर अंजिराचे उत्पादन ऑक्टोबर पासून सुरू होते व जून महिन्यापर्यंत ते मिळत राहते.
यामध्ये हे फळे शेतकऱ्यांकडून घेऊन ते मजुरांच्या मार्फत काढणी केली जाते व त्याचे प्रतवारी करून कागदी पुठ्ठयाच्या बॉक्समध्ये व्यवस्थित पॅकिंग करून पुणे आणि मुंबई येथील बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवतात. परंतु त्या ठिकाणची व्यापारी कमी दराने मालाची खरेदी करून जास्त दराने ग्राहकांना विक्री करतात. या व्यवहारातून शेतकऱ्यांना फायदा काहीच होत असून अगदी कमी बाजारभावावर समाधान मानावे लागते.
या सगळ्या समस्येवर उपाय म्हणून सासवड येथील या आठ ते दहा शेतकरी पुत्रांनी स्वतः अंजीर व सीताफळ विक्रीचा निर्णय घेतला. तरुण प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांकडून माल खरेदी करतात. यामध्ये पंधरा ते 16 टन अंजीर आणि सात ते आठ टन सीताफळाची विक्री ते दररोज करतात. शेतकऱ्याकडून पाचशे ते तीन हजार रुपये प्रति कॅरेट या दराने खरेदी केली जाते. त्यानंतर मालाचे प्रतवारी करून हा माल गुजरात, गोवा, दिल्ली, कोलकाता तसेच बेंगलोर, मुंबई या ठिकाणी विक्रीसाठी पाठवतात.
या व्यवहारातून जवळजवळ हे तरुण 30 ते 40 लाख रुपयांची उलाढाल करतात. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सीताफळ व अंजिराला चांगला बाजार भाव मिळत असल्याने तालुक्यामध्ये सर्वत्र या तरुणांचे चर्चा होत आहे. विशेष म्हणजे हे सगळे तरुण शेतकरी कुटुंबातील असून शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल याच्यावर ते लक्ष देतात.
त्यामुळे हीच पद्धत जर प्रत्येक शेतकऱ्यांनी अवलंबली तर नक्कीच चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. आपण पिकवणारे होऊ शकतो तसे विकणारे होणे देखील गरजेचे आहे. शेतकरी बंधूंच्या जीवनात आर्थिक समृद्धी येणे शक्य आहे.