नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! ‘या’ दोन शेतकरी पुत्रांनी नोकरीला लाथ मारली, उभारली शिवमुद्रा अर्बन बँक ; आज करताय कोट्यावधींची उलाढाल

Published on -

Farmer Son Start A Bank : भारत हा एक शेतीप्रधान देश. देशाची निम्म्याहुन अधिक जणसंख्या ही शेतीवर आधारित असून देशाची अर्थव्यवस्था ही सर्वस्वी कृषी क्षेत्रावर आधारित आहे. विशेष म्हणजे शेतीप्रधान देशाचा बळीराजा हा कणा म्हणून ओळखला जातो. दरम्यान आपल्या कष्टाच्या जोरावर देशाच्या अर्थव्यवस्थेचं चाक हाकणारा बळीराजा कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेला नाही.

नवयुवक सुशिक्षित शेतकऱ्याची मुलं आता केवळ शेतीतच नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रात, व्यवसायात आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. असंच एक उत्तम उदाहरण औरंगाबाद जिल्ह्यातून समोर येत आहे. जिल्ह्यातील दोन शेतकरी पुत्रांनी नोकरी सोडून चक्क बँक सुरू केली आहे.

यामुळे सध्या या शेतकऱ्यांच्या मुलांची मोठी चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील मौजे मुरमा येथील मनोज मापारी आणि गणेश मापारी या दोन शेतकऱ्याच्या मुलांनी पाचोड या ठिकाणी शिवमुद्रा अर्बन बँक नामक एका बँकेची स्थापना केली आहे. खरं पाहता या दोघांच्या घरची आर्थिक परिस्थिती ही हालाखीची असल्याने यांनां इच्छा नसताना देखील आपले शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले.

या दोघांचे दहावीनंतर शिक्षण अर्ध्यावर सुटले शिवाय घरी कोरडवाहू शेती यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून उदरनिर्वाह भागवणे मोठे मुश्किल होते. परिणामी या दोघांनी नोकरी करण्यास सुरवात केली. गणेश मापारी यांनी पाचोड या ठिकाणी बँकेत पिग्मी एजंट म्हणून काम केलं मनोज मापारी यांनी एका सेतू सुविधा केंद्रात नोकरी केली. मात्र या रोजनदारीच्या नोकरीतूनही घर चालवणे मुश्किल बनले.

परिणामी या दोघांनी जरा हटके आणि चॅलेंजिंग असं काही करण्याचं ठरवलं. या अनुषंगाने त्यांनी आपल्या शेत जमिनीवर कर्ज काढले आणि पाचोड या ठिकाणी शिवमुद्रा अर्बन बँकेची स्थापना केली. या बँकेची बँकिंग वित्त विभागाकडे नोंदणी असल्याचे सांगितले गेले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 2018 मध्ये भाडेतत्त्वावर इमारत घेऊन या दोघांनी शिवमुद्रा अर्बन बँकेची सुरुवात केली. मनोज मापारी हे मुख्याधिकारी बनले तर गणेश मापारी हे बँकेचे अध्यक्ष बनले.

सुरुवातीला या शेतकरी पुत्रांनी सुरू केलेल्या बँकेत कोणीच खाते उघडत नव्हतं. मात्र सद्यस्थितीला चार हजार लोकांची खाते त्यांच्या बँकेत आहे. शिवाय या बँकेची उलाढाल आता कोट्यावधींच्या घरात गेली आहे. एवढेच नाही तर बँकेकडून कर्ज देखील खातेधारकांना उपलब्ध करून दिल जात आहे.

या बँकेच्या माध्यमातून त्यांनी स्वतःसाठी रोजगाराची सोय केली तसेच इतर बारा जणांना हक्काची नोकरी मिळून दिली आहे. विशेष म्हणजे या बँकेची चितेगाव या ठिकाणी अजून एक शाखा देखील ओपन झाली आहे. यामुळे सध्या या शेतकरी पुत्रांची औरंगाबादसह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe