Krushi Seva Kendra Licence:- ग्रामीण भाग म्हटले म्हणजे बहुसंख्य लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे व ग्रामीण भागातील प्रमुख व्यवसाय हा शेती व्यवसायात आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतीशी निगडित असलेला व्यवसायांना चांगले दिवस असल्याचे आपल्याला दिसून येते.
त्यामुळे बरेच उच्च शिक्षित तरुण आता शेती सोबतच शेती संबंधित असलेल्या जोडधंदे किंवा व्यवसायांमध्ये नशीब आजमावतांना आपल्याला दिसून येत आहेत. अगदी याच प्रकारे जर आपण शेतीशी संबंधित असलेला व्यवसाय बघितला तर तो म्हणजे कृषी सेवा केंद्र होय.

आपल्याला माहित आहे की कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतीला आवश्यक असलेल्या निविष्ठा म्हणजे रासायनिक खते तसेच कीटकनाशके व बी बियाण्यापासून तर इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. परंतु कृषी सेवा केंद्र सुरू करण्यासाठी परवाना आवश्यक असतो व त्याकरिता निश्चित अशी प्रक्रिया आहे. त्यामुळे ती तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.
कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी कुठे करावा लागतो अर्ज?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे कृषी सेवा केंद्राचा परवाना घ्यायचा असेल तर त्याकरिता कृषी पदविका म्हणजे ॲग्री कल्चर मधील डिप्लोमा किंवा कृषी विज्ञान विषयात पदवी म्हणजेच बीएससी असणे गरजेचे आहे.
कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो व यासाठी तुम्ही आपले सरकार या पोर्टल वर जाऊन अर्ज करू शकतात.ही प्रक्रिया अतिशय सोपी असून या ठिकाणी जाऊन तुम्हाला अगोदर नोंदणी करावी लागते व कृषी विभाग हा पर्याय निवडून त्या ठिकाणी कृषी परवाना सेवा या पर्यायावर क्लिक करावे लागते.
या ठिकाणी तुम्ही बियाणे तसेच खते व कीटकनाशके यांच्या विक्रीसाठीचा परवाना मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. हे तिन्ही परवाने तुम्हाला वेगवेगळे घ्यावे लागतात. तुम्हाला जर या तिघांपैकी कुठल्याही एकाच गोष्टीची विक्री करायची असेल तर त्याच गोष्टीविषयीचा आवश्यक परवाना घेऊ शकता.
कोणत्या परवान्याला किती येतो खर्च?
जसे आपण पाहिले की कीटकनाशक तसेच बियाणे व रासायनिक खते विक्रीसाठी वेगवेगळा परवाना घ्यावा लागतो व परवान्यानुसार लागणारे पैसे म्हणजे शुल्क देखील वेगवेगळे असते. जसे की…
कीटकनाशक विक्रीचा परवाना घ्यायचा असेल तर साधारणपणे सात हजार पाचशे रुपये इतका खर्च येतो.
बियाणे विक्रीचा परवाना मिळवायचा असेल तर त्याकरिता एक हजार रुपये इतका खर्च येतो.
रासायनिक खते विक्रीचा परवाना घ्यायचा असेल तर त्यासाठी साधारणपणे 450 रुपये खर्च येतो.
कोणती कागदपत्रे लागतात?
कृषी सेवा परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला काही कागदपत्रे त्यासोबत जोडणी गरजेचे असते व त्यामध्ये…
तुम्हाला ज्या ठिकाणी दुकान टाकायचे आहेत त्या जागेचा गाव नमुना 8, ग्रामपंचायतीचे एनओसी म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र,
शॉप ॲक्टचे प्रमाणपत्र कृषी सेवा केंद्र उभारायची जागा तुमच्या मालकीची नसेल आणि भाड्याने तुम्ही घेत असाल तर भाडेपट्ट्याचा करार, आधार व पॅन कार्ड, अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक शैक्षणिक पात्रतेचे म्हणजेच अहर्ततेच प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे लागतात.
अर्ज केल्यानंतर पुढची प्रक्रिया कशी असते?
जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज सबमिट करतात तेव्हा तो जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी यांच्याकडे जातो. त्यांच्याकडून मंजुरी जेव्हा मिळते तेव्हा तो कृषी उपसंचालक यांच्याकडे येतो.
त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर अंतिम मंजुरी मिळवण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या टेबलवर तो जातो. यांची मंजूर मिळाल्यानंतर तुम्हाला कृषी सेवा केंद्र सुरू करण्याचे परवानगी मिळते व ही सगळी प्रक्रिया साधारणपणे एक महिन्यात पूर्ण होते.
कृषी सेवा केंद्र व्यवसायातून किती पैसा मिळू शकतो किंवा किती नफा कमवू शकतो?
जर कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून मिळणारा नफ्याचा विचार केला तर कीटकनाशक विक्रीतून सात ते 13 टक्क्यांपर्यंत, बियाण्याच्या विक्रीतून दहा ते अकरा टक्क्यांपर्यंत आणि खताच्या विक्रीतून तीन ते सात टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो असे दिसून येते. त्यामध्ये देखील बराच माल हा उधारीवर द्यावा लागतो व यामध्ये त्याचे प्रमाण किती आहे हे देखील महत्त्वाचे ठरते.