International Soybean Rate : देशातील बाजारात गेल्या दोन महिन्यापासून सोयाबीन दरात न चढ न उतार अशी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांमध्ये दरात वाढ होईल की नाही याबाबत मोठी संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. खरं पाहता, गेल्या हंगामात सोयाबीन विक्रमी दरात विकला गेला असल्याने यंदा सोयाबीनचा पेरा वाढला आहे.
गत हंगामात सोयाबीनला 8 हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक दर मिळत होता. अशा परिस्थितीत यंदा किमान सात हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळेल अशी शेतकऱ्यांना सुरुवातीला अशा होती. पण सोयाबीनचा हंगाम जवळपास आता अंतिम टप्प्याकडे चाललाय तरी देखील सोयाबीन दरात अपेक्षित अशी वाढ होत नसल्याने उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर निराशाचे ढग पाहायला मिळत आहेत.

अशातच आज आंतरराष्ट्रीय बाजारातून सोयाबीन उत्पादकांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज जागतिक बाजारात सोया पेंड, सोयाबीन आणि सोया तेल तीनही च्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीन 3 जानेवारी नंतर प्रथमच 15 डॉलरच्या टप्प्यात आला आहे. आज चार वाजेपर्यंत झालेल्या सौंद्यात सोयाबीनला 15.09 डॉलर दर मिळाला म्हणजे 4,553 रुपये एवढा दर आज मिळाला.
जागतिक बाजारात सोया तेलाच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत मात्र आज थोडीशी तेजी यामध्ये होती. पामतेलाच्या दरात सातत्याने चढ-उतार होत असल्याने याचा विपरीत परिणाम सोयतेलावर होत असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. या सोबतच आज सोयापेंडच्या दरातही जागतिक बाजारात तेजी आली होती.
इकडे देशांतर्गत बाजारात आज 5300 ते 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा दर सोयाबीनला मिळाला आहे. जागतिक बाजारात सुरू असलेली चढ-उतार कुठे ना कुठे देशांतर्गत बाजारात दबावाचं काम करत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. परंतु असे असले तरी, सोयाबीन दरवाढीसाठी पूरक परिस्थिती देखील तयार होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.
चायना कडून सोयाबीनची वाढलेली मागणी, प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्र अर्जेंटीनामध्ये पडलेला दुष्काळ आणि यामुळे घटनारं सोयाबीन उत्पादन याशिवाय भारत सरकारने सोयातेलाला एक एप्रिल 2023 पासून आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याने सोयाबीन दरात वाढ होणार असल्याचा दावा जाणकारांनी केला आहे. निश्चितच दरवाढीसाठी पोषक परिस्थिती पाहता येत्या काही दिवसात उत्पादक शेतकरी बांधवांना याचा फायदा मिळेल एवढं नक्की.