Oben Electric Rorr EZ Bike:- गेल्या एक ते दोन वर्षापासून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येत आहे व या वाहनांचा ग्राहक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर तसेच इलेक्ट्रिक बाइक आणि इलेक्ट्रिक कार यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून अनेक वाहन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आता वेगवेगळी वैशिष्ट्य असलेली इलेक्ट्रिक वाहने उत्पादित केली जात आहेत.
त्यामुळे येणाऱ्या काही वर्षांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात आपल्याला इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसून येतील. परंतु यामध्ये आपण बऱ्याचदा वाचले किंवा ऐकले असेल की इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटरला किंवा कारला आग लागल्याच्या घटना घडतात. अचानकपणे चालत्या वाहनांना आग लागल्याच्या अनेक घटना आपण मागच्या वर्षी देखील ऐकल्या किंवा वाचल्या असतील.
परंतु आता इलेक्ट्रिक वाहनांच्या या समस्येवर नामी उपाय म्हणून एका कंपनीने खास तंत्रज्ञान वापरत मार्केटमध्ये उतरण्याची तयारी केलेली आहे. आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरीचे खूप महत्त्व असते व या बॅटरीवरच वाहनांचा परफॉर्मन्स तसेच सुरक्षा व किंमत अवलंबून असते.
या अनुषंगाने भारतीय इलेक्ट्रिक बाइक निर्माता कंपनी ओबेन इलेक्ट्रिकने मात्र यावर उपाय शोधला असून त्यांची येणारी मोटरसायकल तापमान बदल सहन करू शकणार आहे व नुकताच कंपनीने या मोटरसायकलचा टिझर रिलीज केला आहे. या बाईकचे नाव ओबेन इलेक्ट्रिक Rorr EZ असे ठेवले आहे. विशेष म्हणजे ही बाईक 7 नोव्हेंबर रोजी लॉन्च केली जाणार आहे.
काय राहणार Oben Electric Rorr EZ मध्ये खास?
ही एक नवीन प्रकारची बाईक असून बाईक चालवत असताना ज्या काही सामान्य समस्या येतील त्यावर उपाय शोधता येईल अशा पद्धतीने डिझाईन केलेली बाईक आहे. या बाईकमध्ये लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.
त्यामुळे ही बॅटरी उष्णता सहन करण्यासाठी सक्षम असून तिचा टिकाऊपणा आणि भारताच्या विविध भागातील हवामानात सपोर्ट करेल अशा विश्वसनीयतेसाठी ती ओळखली जाणार आहे.
ही कंपनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट तसेच बॅटरी, मोटर्स, कंट्रोल युनिट तसेच फास्ट चार्जर सारख्या प्रमुख घटकांच्या निर्मितीपर्यंत संपूर्ण गोष्टींची जबाबदारी घेते. तसेच विक्रीनंतरचा ग्राहकांना सपोर्ट देखील कंपनी ऑफर करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
ओबेन इलेक्ट्रिक कंपनीकडे आहे 25 वर्षे पेक्षा अधिकचा इलेक्ट्रिक वाहन संशोधनाचा अनुभव
ओबेन इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना बेंगलोरमध्ये ऑगस्ट 2020 या वर्षी झाली. ही कंपनी प्रामुख्याने विकास आणि संशोधन या गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. या कंपनीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ही इलेक्ट्रिक मोटरसायकल निर्मितीत तज्ञ कंपनी आहे व इलेक्ट्रिक वाहन संशोधनाचा 25 वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव या कंपनीकडे आहे.
मुळातच या कंपनीचा उद्देश असा आहे की भारताचा जो काही इलेक्ट्रिक दुचाकी बाजार आहे यामध्ये चांगला आणि मोठ्या प्रमाणावर बदल घडवणे हा आहे.
त्यामुळे त्यांनी त्यांच्या या बाईकमध्ये लिथियम आयर्न फॉस्फेट म्हणजेच एलएफपी सारख्या प्रगत बॅटरी तंत्रज्ञानावर भर दिला आहे. त्यामुळे ग्राहकांची सुरक्षेमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.