Okra Farming : भारतात शेतकरी पारंपारिक पिकांसोबतच तरकारी अर्थातच भाजीपाला वर्गीय पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. भाजीपाला पिकांमध्ये भेंडीचा देखील समावेश होतो. अल्प कालावधीत आणि कमी खर्चात काढण्यासाठी तयार होणाऱ्या या पिकाचे आपल्या राज्यातही शेतकरी मोठ्या प्रमाणात शेती करतात.
दरम्यान जाणकार लोक या पिकातुन चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी सुधारित जातींची लागवड करण्याचा सल्ला देत असतात. विशेष म्हणजे आता सामान्य भेंडीपेक्षा बाजारात लाल भेंडीची मागणी मोठी वाढली आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी जर लाल भेंडीची शेती सुरू केली तर शेतकऱ्यांना यातून अधिक उत्पन्न मिळणार आहे. यामुळे आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी लाल भेंडीच्या सुधारित जातींची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, रेड लेडीफिंगर म्हणजे लाल भेंडीची लागवड ही आपल्या सामान्य हिरव्या भेंडीप्रमाणेच केली जाते आणि त्याची झाडे देखील हिरव्या भेंडीसारखीचा 1.5 ते 2 मीटर उंच असतात.
लाल भेंडीचे पीक हे ४० ते ४५ दिवसांत येण्यास सुरुवात होते. म्हणजेच लागवड केल्यापासून अवघ्या दीड महिन्यात यातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळणार आहे. तसेच लाल भेंडीचे पीक हे चार ते पाच महिने उत्पादन देत राहते.
असं सांगितलं जातं की, एक एकर लाल भेंडीच्या लागवडीतून सुमारे 50 ते 60 क्विंटल उत्पादन शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होते. निश्चितच लाल भेंडीतून एकरी चांगला उतारा मिळत असून याला बाजारात अधिक दर मिळत असल्याने लाल भेंडीची शेती सामान्य भेंडीच्या तुलनेत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
लाल भेंडीच्या सुधारित जाती नेमक्या कोणत्या बरं…!
खरं पाहता, लाल भेंडीच्या दोनच प्रगत जाती देशात विकसित झाल्या आहेत. मात्र विकसित झालेल्या या दोन्ही जाती सुधारित असून यातून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळत आहे. आझाद कृष्णा आणि काशी लालिमा अशा या दोन्ही जातींची नावे आहेत. या दोन्ही जातींच्या विकासासाठी भारतीय कृषी शास्त्रज्ञांनी 1995-96 पासून काम सुरू केले होते.
भारतीय भाजी संशोधन संस्था, वाराणसी, उत्तर प्रदेश या ठिकाणी लाल भेंडीच्या जातीवर संशोधन सुरू होते. या ठिकाणी 23 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर लाल भेंडीची यां दोन जाती विकसित करण्यात यश आले आहे. या दोन्ही लाल भेंडीच्या जातीचा रंग जांभळा आणि लाल असतो.
त्याची लांबी 10 ते 15 सेमी आणि जाडी 1.5 ते 1.6 सेमी असते. लाल भेंडीमध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. या दोन्ही जातींच्या भिंडीच्या आतील भाग हा लाल असतो.