Onion Farming : कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणारा एक मुख्य नगदी पीक आहे. या पिकाची राज्यातील बहुतांशी जिल्हा शेती केली जाते. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील अर्थकारण कांदा या नगदी पिकावर अवलंबून आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात कांद्याच्या शेतीत नाविन्यपूर्ण असा बदल घडवून आणत आहेत.
खरं पाहता जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी बांधव पारंपारिक पद्धतीने कांदा लागवड न करता मल्चिंग पेपर वर कांदा लागवड करत असल्याचे चित्र आहे. मल्चिंग पेपर अंथरून कांदा लागवड आणि पाणी व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर यामुळे शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची वाढती व्याप्ती पाहायला मिळत आहे.
नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील हा आधुनिक प्रयोग केला आहे. तालुक्यातील पाचेगाव येथील एका शेतकऱ्याने मल्चिंग पेपर अंथरूण आणि ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून कांदा लागवड केली आहे. खरं पाहता तालुक्यातील हजारो हेक्टर शेत जमिनीवर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली आहे.
विशेष म्हणजे पारंपारिक पद्धतीने देखील मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. दरम्यान पाचेगाव येथील बाबासाहेब मतकर यांनी मल्चिंग पेपर वरील कांदा लागवड केली आहे. बाबासाहेब यांनी हा प्रयोग पहिल्यांदाच केला असून दीड एकर शेत जमिनीवर बेडवर मल्चिंग पेपर टाकून ठिबक सिंचन प्रणालीच्या माध्यमातून लागवड केली आहे.
मतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना मल्चिंग पेपरचे एकरी साधारण आठ बंडल लागले आहेत. यात एकूण २ लाख ८८ हजार छिद्र झालेत आणि तितक्याच कांदा रोपांची लागवड त्यामध्ये करण्यात आली आहे. मतकर यांना एकरी 25 टन उत्पादन मिळण्याची आशा आहे. निश्चितच मतकर यांच्या अपेक्षेप्रमाणे कांद्याचे उत्पादन त्यांना मिळाले तर भविष्यात पंचक्रोशीत मल्चिंग पेपर वरील कांदा लागवड वाढण्याची शक्यता आहे.
मतकर या प्रयोगशील शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, पारंपारिक पद्धती ऐवजी मल्चिंग पेपर वर कांदा लागवड केल्यास एकसारख्या आकाराचा कांदा उत्पादित होण्यास मदत होते. म्हणजे प्रत्येक कांद्याचे वजन एकसारखे मिळते. कांद्याचा आकार आणि वजन सारखे असल्याने बाजारात याला अधिक दर मिळतो. मल्चिंग पेपरवर एकसारख्या अंतरावरील छिद्रांमुळे दोन रोपांमधील अंतर एकसारखे असल्याने कांद्याची वाढ एकसारखी होते.
विशेष म्हणजे या पद्धतीने कांदा लागवड केल्यास कांदा रोप अधिक लागतात. साहजिकच यामुळे उत्पादन वाढणार आहे. दरम्यान मल्चिंग पेपरचा अजून एक मोठा फायदा म्हणजे मल्चिंग पेपर असल्यामुळे पिकात तणांची वाढ नियंत्रणात राहते. परिणामी खुरपणी व तणनाशकांच्या फवारणीमध्ये मोठी बचत होते. म्हणजेच उत्पादन खर्चात बचत होत असते.
शिवाय तणनाशक फवारणी करण्याची आवश्यकता नसल्याने दर्जेदार कांदा उत्पादन मिळते. पिकात आच्छादन असल्याने जमिनीत कायम ओलावा टिकून राहतो. म्हणजे यामुळे खतांची आणि पाण्याची बचत होते. यामुळे पिकाचे उन्हापासून संरक्षण करता येते आणि उत्पादन 25 टक्क्यांनी वाढते. निश्चितच मल्चिंग पेपरवर कांदा लागवड करण्याचे अनेक फायदे तज्ञांकडून आणि शेतकऱ्यांकडून सांगितले गेले आहेत.