Pune Successful Farmer : गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवड मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. राज्यात प्रामुख्याने डाळिंब, केळी, पपई, अंजीर यांसारख्या फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना यातून चांगली कमाई होते.
मात्र असे असले तरी फळबाग वर्गीय पिकातून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी बांधव रासायनिक खतांचा अमर्यादित वापर करत असल्याचे चित्र आहे. यामुळे कुठे ना कुठे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळत असलं तरी देखील जमिनीचा पोत ढासाळत आहे. परंतु आता प्रयोगशील शेतकरी बांधव रासायनिक खतांचा दुष्परिणाम ओळखून चूकले आहेत आणि सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागले आहेत.

विशेष म्हणजे सेंद्रिय खतांच्या वापरातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या मौजे पिंपळे येथील सुरेश धोंडीबा पोमन आणि विलास धोंडीबा पोमन या शेतकरी बंधूंनी देखील सेंद्रिय खतांचा वापर करत फळबाग पिकातून चांगले विक्रमी उत्पादन मिळवत सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. सासवड पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वसलेले पिंपळे हे छोटंसं गाव या शेतकरी बंधूंच्या प्रयोगामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात नावाजल आहे.
पोमन बंधू आपल्या शेतात डाळिंब, अंजीर, सीताफळ या फळबाग पिकांसमवेतच भाजीपाला म्हणजेच तरकारी पिकांची देखील लागवड करत असतात. पोमन बंधूंच्या शेतीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे त्यांनी रासायनिक खतांच्या वापराऐवजी सेंद्रिय खताचा वापर सर्वाधिक केला आहे. तसेच त्यांनी पाणीबचतीसाठी वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अवलंबला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
त्यांच्या शेतात पाच लाख लिटर साठवण क्षमता असलेले दोन शेततळे देखील आहेत. पाणी निश्चितच त्यांच्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असले तरीदेखील पाणी हे जीवन आहे, त्याचा अपव्यय टाळणे हे प्रत्येक पृथ्वीवासीयाचे कर्तव्यचं आहे. हेच कारण आहे की त्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा उपयोग केला आहे.
विशेष म्हणजे त्यांच्या शेतालगतच दोन कोल्हापुरी बंधारे आहेत, ज्यामुळे पाण्याची भूजल पातळी वाढली असून जवळपास दोन महिने अधिक पाणी टिकत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पोमन बंधू यांच्याकडे एकूण 25 एकर शेत जमीन आहे. पोमन यांचे कुटुंब एकत्रित राहत असून शेतीमध्ये यामुळे त्यांना अधिक उत्पादन मिळवण्यास मदत होत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पोमन कुटुंबियांनी आपल्या 25 एकर शेत जमिनीपैकी पाच एकर शेत जमिनीवर सिताफळ, आठ एकर शेत जमिनीवर पेरू, अंजीर एक एकर आणि डाळिंब अडीच एकर क्षेत्रावर लावले आहे. उर्वरित शेत जमिनीत टोमॅटोचे पीक ते घेत असतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या शेतजमीनीत चार ते पाच प्रकारच्या पेरूची लागवड करण्यात आली आहे.
यामध्ये रत्नदीप जातीच्या पेरूची देखील त्यांनी शेती सुरू केले असून या जातीचा पेरू हा बाजारात सर्वाधिक मागणीमध्ये राहतो. त्याच्या गावांपासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हणजे जवळपास तीन किलोमीटर लांबीच्या अंतरावर असलेल्या सासवडमध्ये त्यांनी उत्पादित केलेले सिताफळ आणि पेरू मोठ्या प्रमाणात विकले जातात आणि त्या बाजारपेठेत मोठी मागणी या शेतीमालाला आहे.
सिताफळ हजार ते पंधराशे, पेरू 800 ते 900 याप्रमाणे सासवडमध्ये विक्री होत आहे. तसेच त्यांनी उत्पादित केलेले अंजीर हे मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले जाते. विशेष म्हणजे पोमन बंधू फळपिकांसाठी देखील शेणखत आणि इतर सेंद्रिय खतांचा वापर करत आहेत यामुळे त्यांच्या शेतमालाला बाजारात मागणी आहे. सिताफळ, पेरू यासाठी शेणखत वापरले जाते तसेच डाळिंब आणि अंजीर या दोन्ही पिकांसाठी लेंडी खताचा वापर केला जातो.
पोमन यांच्या मते कोरोनापूर्वी त्यांना समाधानकारक उत्पन्न मिळत होतं मात्र कोरोनानंतर बाजारात शेतमालाला अधिक दर मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे. मात्र आता हळूहळू परिस्थिती सुधारत असून भविष्यात चांगले उत्पन्न मिळेल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे. निश्चितच एकीकडे उत्पादनात वाढ व्हावी म्हणून शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करत आहेत.
यामुळे जमिनीचा पोत ढसाळत असून अपेक्षित असे उत्पादन मिळत नाहीये. यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते आणि उत्पादन कमी मिळतं आहे. मात्र पोमन बंधूंनी रासायनिक खतांचा वापर मर्यादित करून सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर केला आहे. यामुळे जमिनीचा पोत अबाधित राहिला असून उत्पादनात वाढ झाली आहे आणि उत्पादन खर्चात बचत झाली आहे. एकंदरीत काय तर सेंद्रिय खतांचा वापर केल्याने पोमन बंधू यांना शेतीतून चांगले उत्पादन आणि उत्पन्न मिळत आहे.