लोकसभेत मँजिक केल्यानंतर शरद पवारांनी विधासभेचा बिगुलही सोमवारी वाजवला. सोमवारीच त्यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह कायम ठेवलं. आज त्याच दिवशी पवार साहेबांनी सांगलीत त्यांच्या पहिल्या उमेदवाराची घोषणाही केली. रोहित पाटलांना त्यांनी उमेदवार म्हणून घोषित केलं. आता रोहित पाटील हे फक्त २५ वर्षांचे आहेत. हा पहिला उमेदवार पाहता पवार साहेबांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय, हे समजतं. आपल्या नव्या पक्षाची बांधणी साहेब नेमकी कशी करणार आहेत, याचा अंदाज येतो. याच फाँर्म्यूलाचा धागा पकडून आम्ही नगरमध्ये ते कोणते उमेदवार देतील, याचा आढावा घेतला. शरद पवारांचे नगरमधील उमेदवार कोण, याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…
गेल्या वर्षी राष्ट्रवादीत उभी फूट पडली. ४१ आमदारांचा एक मोठा गट शरद पवारांपासून फुटून अजितदादांकडे गेला. मात्र तरीही वयाच्या ८३ व्या वर्षीही पवार साहेबांनी लोकसभेला किमया करुन दाखवली. आता विधानसभा निवडणुकांतही शरद पवार आपली जादू कायम ठेवण्याच्या मूडमध्ये दिसताहेत. कधी काळी बालेकिल्ला असलेल्या नगर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकून आणत पवार साहेबांनी आपली ताकद दाखवून दिली. आता नगर जिल्ह्यातील १२ विधानसभेतही ते मॅजिक करण्याच्याच तयारी दिसताहेत. महाविकास आघाडीच्या संभाव्य जागावाटपात राहुरी, कर्जत-जामखेड, पारनेर या हक्काच्या तीन जागांसह, शेवगाव-पाथर्डी व अकोला अशा एकूण पाच जागा शरद पवार गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे.
आता तासगावातून रोहित पाटलांची उमेदवारी पाहिली तर, नगर जिल्ह्यातील पाचही जागांवर पवार साहेब तरुण उमेदवार देण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. नव्या रक्ताला संधी देत पक्षाची पुनःर्बांधणी करायचीय, हेच सध्या पवारांच्या डोक्यात असल्याचं दिसतय. गेली पाच दशकांच्या राजकारणात शरद पवारांच्या डोक्याचा अंदाज कुणालाच आला नाही. स्वतः सुप्रिया सुळेही हे जाहीरपणे सांगतात. त्याच शरद पवारांचा पहिला उमेदवार पाहिला, तर नवीन चेहरे घेऊन त्यांना आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करायचीय, हे स्पष्ट दिसते. पवार साहेब अगदी तिशी-चाळीशीतले युवा चेहरे घेऊन, विधानसभेच्या रणांगणात उतरतील, ही शक्यता वाढते.
येत्या विधानसभेला शरद पवार हे युवा चेहऱ्यांवर डाव लावतील, याचा अंदाज रोहित पवारांनीही दिला होता. 28 जूनला प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी अजितदादा गटाचे 22 आमदार आमच्या संपर्कात असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यातील पक्त 10 ते 12 आमदारांनाच पवार साहेब बरोबर घेतील, असंही स्पष्ट केलं होतं. आता अजितदादांसोबत गेलेल्या आमदारांचा विचार केला, तर 41 पैकी 10-15 आमदार हे चाळीशीच्या आतले आहेत. तेच आमदार कदाचित, पवार साहेब सोबत घेतील, असाही अर्थ लावला जावू शकतो. एकंदर रोहित पाटलांची उमेदवारी पाहता शरद पवारांना नव्या शिलेदारांवर विश्वास दाखवायचाय हे स्पष्ट झालंय. हे सारं पाहता आता नगर जिल्ह्यात पवार साहेब कुणावर डाव लावतील, ते आपण पाहू…
शरद पवार गटाकडे राहुरीची जागा जाण्याची शक्यता आहे. तेथील आमदार प्राजक्त तनपुरे, हे 47 वर्षांचे आहेत. शरद पवारांचा युवा नेत्यांवर निवडणूक लढण्याचा प्लॅन पाहता, यावेळीही तनपुरेंचं तिकीट फिक्स समजलं जातं. दुसरी जागा आहे, कर्जत-जामखेडची. तेथील आमदार रोहित पवार हे 38 वर्षांचे आहेत. त्यांचही तिकीट फिक्स समजलं जातंय. शरद पवारांकडे तिसरी जागा जाणार ती पारनेरची. तेथ निलेश लंके हे आमदार होते. मात्र त्यांनी लोकसभेसाठी राजीनामा दिला. निलेश लंके हेही 44 वर्षांचे आहेत. पवारांचा युवा चेहऱ्याचा शोध पाहता, पारनेरमध्येही चाळीशीच्या आसपास असणाऱ्या राणीताई लंकेंच्या नावाचा विचार होण्याची शक्यता वाढते. या तीन जागांशिवाय शरद पवार गटाकडे अकोल्याची जागाही जाण्याची शक्यता आहे. तेथे अमित भांगरेंच्या नावाचा विचार होण्याची शक्यता वाढली आहे. कारण अमित भांगरे हे फक्त तिशीतले आहेत. शेवगाव-पाथर्डीचा विचार केला तर शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार प्रताप ढाकणे हेच फक्त पन्नाशीतले आहेत. मात्र त्यांच्यासोबत असलेल्या तरुणांचा संच पाहता, त्यांच्याही उमेदवारीवर नक्कीच शिक्कामोर्तब होऊ शकतं.