Snake Facts : सापाचं आयुष्य किती असतं ? साप दिसल्यावर काय करावं ? वाचा कधीही न वाचलेली महत्वाची माहिती

Published on -

Snake Facts : आपल्याकडे साप म्हटलं की अनेक लोक भीतीने घाबरतात. साप दिसताच लोक त्याला मारण्याचा प्रयत्न करतात. पहिल्यापासून आपल्या मनात सापाबद्दल एक वेगळीच भिती निर्माण झालेली असते. त्यामुळे आपण साप दिसल्यावर त्याला मारण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यापासून लांब निघून जातो. सापाबद्दल अनेक गैरसमज पसरलेले आहेत. यातला एक सर्वसामान्य गैरसमज म्हणजे “साप फक्त मारलं तरच मरतो”. पण हे नक्की खरं आहे का? साप किती वर्ष जगतो? चलातर मग जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती

सापांचं आयुष्य किती असतं?

सापांचं आयुष्य त्यांच्या प्रजातीवर आणि त्यांच्या राहणीमानावर अवलंबून असतं. जंगलात राहणारे साप सहसा 14 ते 20 वर्षं जगतात. तर एखादा साप जर बंदिस्त वातावरणात (उदाहरणार्थ – सर्प संग्रहालय, प्राणीसंग्रहालय किंवा संशोधन केंद्र) योग्य काळजीत ठेवला गेला, तर तो 25 वर्षांपर्यंत देखील जगू शकतो. अजगर ही सापांची प्रजाती सर्वात जास्त आयुष्य असलेली मानली जाते. एका अजगराचं सरासरी आयुष्य 30 ते 40 वर्षांपर्यंत असू शकतं. मात्र सध्या ही माहिती फार कमी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, त्यामुळे अजूनही साप दिसला की तो विषारी असेल, म्हणून मारला जातो.

साप फक्त विषारीच असतो का?

आपल्याकडे एक चुकीचा गैरसमज पसरलेला आहे की “प्रत्येक साप विषारी असतो”. भारतात सापांच्या सुमारे 300 हून अधिक प्रजाती आढळतात, त्यापैकी फक्त 4 प्रजाती अत्यंत विषारी मानल्या जातात. या चार प्रजाती म्हणजे – नाग (कोब्रा), घोणस (रसेल वायपर), मण्यार (क्रेट) आणि फुरसा (सॉ-स्केल्ड वायपर). या चार सापांना “बिग फोर” असंही म्हटलं जातं.

बाकीच्या शेकडो सापांच्या प्रजाती या माणसाला फारसा धोका देत नाहीत. उलट हे साप शेतीसाठी उपयुक्त असतात कारण ते उंदीर, बेडूक, कीटक अशा किडींचा बंदोबस्त करतात. त्यामुळे त्यांना ‘शेतकऱ्यांचे मित्र’ असंही म्हटलं जातं.

साप दिसल्यावर काय करावं?

साप दिसला म्हणजे लगेच दगड, काठी घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करणं चुकीचं आहे. कारण आपल्याला तो साप विषारी आहे की नाही, हे ओळखता येत नाही. अशावेळी सर्पमित्र (Snake Rescuer) यांना फोन करून बोलवणं योग्य आहे. सर्पमित्र हे प्रशिक्षित लोक असतात, जे सापाला न मारता योग्य पद्धतीने पकडतात आणि नंतर सुरक्षित ठिकाणी सोडतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe