Soybean Oil Import Duty : सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवल जाणार एक मुख्य तेलबिया पीक. या पिकाची राज्यातील बहुतांशी भागात शेती होते, साहजिकचं लाखों शेतकऱ्यांचे अर्थकारण यावर अवलंबून आहे. मात्र खरीप हंगामात अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला.
उत्पादनात कधी नव्हे ती घट झाली. अशा परिस्थितीत बाजारात सोयाबीनला चांगला भाव मिळेल आणि उत्पादनात झालेली घट भरून निघेल अशी आशा उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र या हंगामात अगदी सुरुवातीपासून सोयाबीन दर दबावत आहेत. मध्यंतरी सोयाबीन 6,000 रुपये प्रति क्विंटल एवढ्या सरासरी दरात विक्री होत होते. पण हा दर अधिक काळ टिकू शकला नाही.

सद्यस्थितीला सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी दरात विक्री होत आहे. दरम्यान आता सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्यावर्षी कच्चे सोया तेल शुल्कमुक्त आयात करण्यास केंद्राने परवानगी दिली होती. यामुळे कुठे ना कुठे सोयातेलाचे दर पडलेत तसेच याचा परिणाम म्हणून सोयाबीनचे दर देखील कोसळलेत.
दरम्यान येत्या आर्थिक वर्षापासून कच्चे सोयाबीन तेल आयातीवर शुल्क आकारले जाणार आहे. म्हणजेच येत्या आर्थिक वर्षातील शुल्कमुक्त कच्चे सोयातेल आयातीचा निर्णय रद्द करण्यात येणार आहे. आता कच्चे सोयातेल आयातीसाठी शुल्क आकारले जाईल. यामुळे सोयातेलं आणि सोयाबीन दराला आधार मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, 24 मे 2022 रोजी केंद्र शासनाने खाद्यतेलाच्या दरात तेजी आली असल्याने वाढती महागाईचा हवाला देत कच्चे सोयातेल आणि कच्चे सूर्यफूल तेल विनाशुल्क आयातीला परवानगी दिली. आगामी दोन वर्ष प्रत्येकी वीस लाख टन कच्च सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्य फुल तेल विनाशुल्क आयातीला परवानगी देण्यात आली.
म्हणजेच 2022-23 आणि 2023-24 या दोन आर्थिक वर्षात कच्चे सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाची प्रत्येकी 40 लाख टन एवढी विनाशुल्क आयात होणार होती. शासनाने हा निर्णय खाद्यतेलाच्या किमती वाढल्या असल्याने घेतला होता. मात्र आता खाद्य तेलाच्या किमती लक्षणीय कमी झाल्या आहेत. परिणामी शासनाने आता 1 एप्रिल 2023 पासून कच्च सोयाबीन तेल शुल्कमुक्त आयातीचा निर्णय रद्द केला आहे. म्हणजेच आता सोयाबीन तेल आयातीसाठी शुल्क द्याव लागणार आहे.
मात्र सूर्यफूल तेल आयात पुढील वर्षापर्यंत शुल्कमुक्त राहणार आहे. परंतु सोया तेल आयात करण्यासाठी एक एप्रिल 2023 पासून आयात शुल्क द्यावा लागणार असल्याने सोयाबीन दराला आता आधार मिळणार आहे. जागतिक बाजारात सोयापेंड आणि सोयाबीन तेजीत आहे मात्र खाद्यतेल दर कमी आहेत.
अशा परिस्थितीत आता भारत सरकारने कच्चे सोयातेल शुल्कमुक्त आयात रद्द केली असल्याने सोया तेलाचे दर वाढतील आणि परिणामी सोयाबीनचे भाव वाढतील असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. निश्चितच येत्या आर्थिक वर्षात सोयाबीन बाजारभावात वाढ होण्याचा तज्ञांचा हा अंदाज सोयाबीन उत्पादकांच्या आशा पल्लवीत करून गेला आहे.